कलकत्ता, दि. १९ (लोकाशा न्यूज) : राष्ट्रीय तपास यंत्रणेनं (एनआयए) शनिवारी सकाळी पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये छापे टाकत मोठी कारवाई केली. एनआयएनं पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद आणि केरळमधील एर्नाकुलम येथील अनेक ठिकाणांवर छापे टाकले. यादरम्यान दहशतवादी संघटना अल कायदाशी निगडीत असलेल्या ९ दहशतवाद्यांना अटक करम्यात आली. एनआयएनं पश्चिम बंगालमधून सहा तर केरळमधून तीन जणांना अटक केली.
दहशतवाद्यांकडून डिजिटल उपकरणं, काही कागदपत्रं, जिहादी साहित्य, हत्यारं, देशी हत्यारं आणि स्फोटकं तयार करण्याची कागदपत्र आणि अन्य सामग्री जप्त करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार एनआयएला पश्चिम बंगाल आणि केरळसहित देशातील काही ठिकाणी अल कायदाच्या आंतरराज्यीय मॉड्यूल बाबत माहिती मिळाली होती. ही संघटना भारतातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणी दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचत असल्याची माहितीही मिळाली आहे.