बीड

कोविड केअर सेंटरमधून पलायन केलेला सराईत गुन्हेगाराच्या एलसीबीने आवळल्या मुसक्या

बीड, दि. 18 (लोकाशा न्यूज) : येथील कोविड केअर सेंटरमधून पलायन केलेल्या 24 वर्षीय सराईत गुन्हेगारास बीड स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी जेरबंद केले आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीस (रा.रामगव्हाण ता.अंबड जि.जालना) पलायन करण्यापूर्वी बीड ग्रामीण ठाण्यातील दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. त्याची पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यापूर्वी त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. यावेळी तो पॉझिटिव्ह आल्याने त्यास शहरातील आयटीआय सेंटर येथील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याने 25 जुलै रोजी पोलिसांची नजर चुकवून तेथून पलायन केले. याप्रकरणी त्याच्याविरोधात शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या आरोपीच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेची पथके कामाला लागली. गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरुन आरोपी हा डोनगाव टाका (ता.पाचोड जि.औरंगाबाद) येथे असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वोतपरी उपाययोजना करुन प्रयत्न सुरु केले. त्यावेळी आरोपी गायरानात दिसून आला. त्याने पोलिसांना पाहून पळ काढला, त्याचा 10 ते 12 किलोमीटर पाठलाग करुन त्यास शिताफीने पोलिसांनी पकडले. ही कारवाई पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय अधिकारी भास्कर सावंत, पोलीस निरीक्षक भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि.गोविंद एकीलवाले, पोलीस कर्मचारी तुळशीराम जगताप, भास्कर केंद्रे, नरेंद्र बांगर, विकास वाघमारे, विकी सुरवसे, चालक संतोष हारके आदींनी केली.

आरोपीवर विविध ठिकाणी दाखल
आहेत 17 गुन्हे

आरोपीवर विविध ठिकाणी 17 गुन्हे सदरील सराईत आरोपीविरोधात बीडसह जालना, औरंगाबाद, अहमदनगर जिल्ह्यात 17 गुन्हे दाखल आहेत. त्याला सध्या शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन केले असून पोलिसांनी त्याची चौकशी सुरु केली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!