बीड, दि. 12 (लोकाशा न्यूज) : सध्या महाराष्ट्रामध्ये एका बाजूने उन्हाची काहिली तर दुसर्या बाजूने लोकसभा निवडणूकीमुळे राजकिय वातावरण चांगलेच तापलेले आहे. याच तापलेल्या वातावरणात महाराष्ट्राचा विनोदाचा बादशहा सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे हे धुमाकुळ घालणार आहेत. आता मकरंद अनासपुरे राजकारण गेलं मिशीत या चित्रपटातून राज्यातील प्रेक्षकांना खळखळून हसवणार आहेत. येत्या 19 एप्रिलपासून हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मकरंद अनासपुरे यांनी भाषेबरोबर आपल्यातील अभिनयाच्या जोरावर संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांना खर्या अर्थाने वेढ लावलेलं आहे, त्यांनी अनेक चित्रपटांच्या माध्यमातून अनेक मुद्द्यांकडे सरकारचे लक्षही वेधून घेण्याचे काम केलेले आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातील दिग्गज अभिनेत्यांच्या यादीमध्ये त्यांचे एक नाव आहे. सध्या चालू असलेल्या राजकारणावर मार्मिक आणि खुसखुशीत भाष्य करणारा ज्येष्ठ ग्रामीण लेखक रा.रं. बोराडे ह्यांच्या अग अग मिशी ह्या कथेवर आधारित राजकारण गेलं मिशीत हा बकुळी क्रिएशन निर्मिती असलेला आणि मकरंद अनासपुरे यांचे दिग्दर्शन व प्रमुख भुमिका असलेला चित्रपट येत्या 19 एप्रिलपासून महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. सध्या लोकसभा निवडणूकीचं वातावरण आहे, या वातावरणामध्ये प्रेक्षकांना मनसोक्त हसवून विचार करायला लावणारा हा एक सुंदर मार्मिक सिनेमा आहे. या अगोदर मकरंद अनासपुरे यांचे राजकिय पार्श्वभुमिवर असलेले खुर्ची सम्राट, गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा, पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा यासारखे राजकिय विनोदी चित्रपट अतिशय गाजले, तसाच उत्कृष्ट प्रतिसाद याही चित्रपटाला मिळेल याची खात्री मकरंद अनासपुरे आणि त्यांच्या संपूर्ण टिमने व्यक्त केलेली आहे. या चित्रपटाचे निर्माते मच्छिंद्र लंके, सुरेश पठारे, शिल्पा अनासपुरे, त्रिशला देशमाने असून छाया दिग्दर्शक सुरेश देशमाने, संगित अतूल दिवे, कथाविस्तार योगेश शिरसाठ, संकलन अनंत कामथ आहेत तर कलाकार मकरंद अनासपुरे सोबत प्राजक्ता हणमघर, प्रकाश भागवत, डॉ. विजय देशमुख, डॉ. राजू सोनवणे, नितीन कुलकर्णी, बाळू मुकादम, प्रशांत जाधव, विनित भोंडे, हरीश तिवारी, छोटू विठ्ठल, श्वेता पारखे, उनती कांबळे, रेश्मा राठोड, सुनिल डोंगर, शैलेश रोकडे, विश्वनाथ कुलकर्णी, अनुपमा पाटील हे आहेत, त्यामुळे येत्या 19 एप्रिलला प्रदर्शीत होणार्या राजकारण गेलं मिशीत हा चित्रपट बघायला विसरू नका, असे आवाहन करण्यात येत आहे.