अंबाजोगाई-तालुक्यातील धानोरा (बु) येथे धक्कादायक घटना घडली आहे. चाळीस वर्षीय ऊसतोड मजुराच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी (दि.१६) रात्री उशिरा उघडकीस आली आहे.
महादेव गुरुबा काळुंके ( वय ४०, रा. धानोरा बुद्रुक, ता. अंबाजोगाई, बीड) असं खून झालेल्या ऊसतोड मजुराचे नाव आहे. अगदी राहत्या घरापासून १०० मीटर अंतरावर सदरील घटना घडली आहे. महादेवचा चुलत भाऊ रात्री दीड वाजताच्या दरम्यान प्रातः विधीसाठी जात असताना महादेव हा रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचा दिसला. त्याला उठवण्याचा प्रयत्न केला असता त्याचा मृत्यू झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने घटना घरच्यांना सांगितली. महादेवचा एक कान देखील तुटल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
घटनेची माहिती कळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस पहाटे ३.०० वाजताच्या दरम्यान घटनास्थळी दाखल झाले. यावेळी त्यांच्या सोबत उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले हेही उपस्थित होते. घटनेची प्राथमिक माहिती घेऊन सदरील मृतदेह अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आला आहे.
दरम्यान सदरील घटना कोणत्या कारणामुळे घडली हे तपासात समोर येणार आहे. महादेव काळुंके हा ऊसतोड मजूर होता. घरातील कर्ता असल्याने त्याचे कुटुंब उघड्यावर आले आहे.चार वर्षांपूर्वी त्याच्या मोठ्या मुलाचं लग्न झालेले आहे. तर एक १३ वर्षाची मुलगी, ९ वर्षाचा मुलगा, पत्नी असा परिवार आहे.