Uncategorized

पंकजाताई मुंडेंच्या पुढाकाराने पुन्हा सुरू झाली जलसंधारणाची चळवळ, गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान व नाम फाऊंडेशनच्या वतीने कन्हेरवाडी, कौठळीत नाला खोलीकरणाचे काम वेगात,सरपंच, ग्रामस्थांनी मानले आभार

परळी वैजनाथ ।दिनांक ०८।
गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान आणि नाम फाऊंडेशन यांच्या संयुक्त सहकार्याने तालुक्यातील कन्हेरवाडी व कौठळी या दोन गावात नाला खोलीकरणाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या पुढाकारातून हे काम सुरू झाले असून जलसंधारणाची चळवळ तालुक्यात पुन्हा एकदा सुरू झाल्याने ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले आहेत.

मान्सूनपूर्व पाऊस अद्याप सुरू झाला नाही, त्या अगोदर नाला खोलीकरण आणि रुंदीकरणाची कामे हाती घेऊन जलसंधारणाची चळवळ तालुक्यात पुन्हा एकदा गतीमान करावी या उद्देशाने पंकजाताई मुंडे यांनी लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या स्मृतिदिनी अर्थात ३ जून रोजी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान व नाम फाऊंडेशनच्या सहकार्याने कन्हेरवाडी व कौठळी या दोन ठिकाणी नाला खोलीकरणाचे काम हाती घेतले आहे.  नाम फाऊंडेशनच्या वतीनं राजाभाऊ शेळके यांनी  या कामासाठी उपलब्ध करून दिलेल्या मशिनची पूजा करून पंकजाताईंनी ३ जूनला या कामाचा शुभारंभ केला. गेल्या चार दिवसांपासून या दोन्ही ठिकाणी नाला खोलीकरण व रुंदीकरणाचे काम वेगात सुरू आहे. यामुळे पावसाळ्यात याठिकाणी मोठया प्रमाणात पाणीसाठा तयार होणार असून शेतकऱ्यांचा याचा फायदा होणार आहे.

पंकजाताईंनी केलेल्या कामांची ग्रामस्थांना पुन्हा आठवण

जलसंधारण मंत्री असतांना जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून पंकजाताई मुंडे यांनी राज्यभरात जलसंधारणाची कामे मोठया प्रमाणात हाती घेतली होती, महाराष्ट्र दुष्काळमुक्त होण्यास त्यामुळे मोठी मदतच झाली होती. परळी तालुक्यात देखील सर्वच ठिकाणी जलसंधारणाची कामे यशस्वी झाली, परिणामी जमिनीत पाणी साठा वाढला. आता पुन्हा एकदा ही कामं सुरू झाल्यानं ग्रामस्थांच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. जनतेच्या हिताची ही कामं हाती घेतल्याबद्दल कन्हेरवाडीच्या सरपंच प्रभावती फड, राजाभाऊ फड, श्रीराम मुंडे, उप सरपंच विजय मुंडे, मिनिनाथ फड, कौठळीच्या सरपंच अनिता श्रीधर काटे, साहेबराव चव्हाण, पप्पू चव्हाण तसेच ग्रामस्थांनी पंकजाताई मुंडे यांचे आभार मानले आहेत.
••••

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!