बीड (प्रतिनिधी) – डीजे वाजवण्यास सक्त बंदी असतांनाही काही जणांकडून लग्न सोहळ्यांमध्ये अजुनही डीजेचा दणदणाट केला जात आहे. त्या अनुषंगाने पोलीसांनी आता कडक कारवाई सुरू केली आहे. शहरातील दोन ठिकाणी कारवाई करत शिवाजीनगर पोलीसांनी लग्न सोहळ्यात वाजणारे दोन डीजे जप्त केले असुन त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया दुपारी उशिरापर्यंत सुरू होती.
बीड जिल्ह्यात डीजे वाजवण्यास परवानगी नाही, असे असतांनाही ठिकठिकाणच्या लग्न सोहळ्यात अजुनही डीजेचा दणदणाट सुरू आहे. अगदी मोठ-मोठ्या आवाजाने डीजे वाजवला जात आहे. आज दुपारी शहरातील समर्थ लॉन्स व रामकृष्ण लॉन्स या ठिकाणी डीजे वाजत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. त्यानुसार शिवाजीनगर ठाण्याचे पो.नि.केतन राठोड व त्यांच्या टीमने लग्न स्थळी जावुन दोन्ही डीजेंवर कारवाई केली. दोन्ही डीजे जप्त करण्यात आले असुन त्यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
चौकट
डीजे वाजवणार्यावर कडक कारवाई होणार-पो.नि.राठोड
बीड जिल्हा प्रशासनाने डीजे वाजवण्यास बंदी घातलेली आहे. तरीही कर्ण-कर्कश आवाजात डीजे वाजविले जात आहेत. विशेषत: लग्न सोहळ्यांमध्ये हे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अशा डीजे वाजवणार्यावर नियमानुसार कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे शिवाजीनगर ठाण्याचे पो.नि.केतन राठोड यांनी सांगितले.