Uncategorized

बीडचे डॉ. कल्याण मुंडे पत्रकारासाठी ठरले देवदुत ! र्‍हदयविकाराचा झटका आलेल्या पत्रकारावर योग्य उपचार करून वाचवले प्राण


बीड, दि. 27 (लोकाशा न्यूज) : वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला मंत्रालयात असतानाच रफिक मुल्ला यांना हृदयविकाराचा झटका आला. अशा स्थितीत आरोग्यदूत असलेले सहकारी मंत्रालयीन पत्रकार दिपक कैतके यांच्या धावपळीमुळे वेळेवर जेजे रुग्णालयात दाखल होऊन डॉ. कल्याण मुंडे यांच्याकडून योग्य उपचार मिळाल्याने रफिक मुल्ला यांना जीवदान मिळू शकले. डॉ. कल्याण मुंडे हे मुळचे परळी येथील रहिवाशी आहेत, ते आयआरएस अधिकारी विश्‍वास मुंडे यांचे मोठे बंधू तर बीडच्या जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांचे ते दिर आहेत.
ज्येष्ठ पत्रकार रफिक मुल्ला यांचा वाढदिवसाच्या पूर्वसंध्येलाच पुनर्जन्म झाला आहे. वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला मंत्रालयात असतानाच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. अशा स्थितीत आरोग्यदूत असलेले सहकारी मंत्रालयीन पत्रकार दिपक कैतके यांच्या धावपळीमुळे वेळेवर जेजे रुग्णालयात दाखल होऊन डॉ. कल्याण मुंडे यांच्याकडून योग्य उपचार मिळाल्याने रफिक मुल्ला यांना जीवदान मिळू शकले. सध्या स्वतंत्र पत्रकार, राजकीय विश्लेषक राहिलेले रफीक मुल्ला यांनी यापूर्वी न्यूज-18 लोकमत’चे राजकीय संपादक म्हणून काम पाहिले आहे. याशिवाय, न्यूज नेशन, झी नेटवर्क, ईटीव्ही, चित्रलेखा, तरुण भारत, सकाळ समूहात त्यांनी काम केलेले आहे. मंत्रालयात तसेच राजकीय पत्रकार म्हणून काम करतांना त्यांनी स्वत:ची एक वेगळी छाप उमटवलेली आहे. ते मूळचे सातारा जिल्ह्यातील खटाव येथील आहेत. पत्रकार रफिक मुल्ला यांचा वाढदिवस 26 मे रोजी असतो. तत्पूर्वीच, आदल्या दिवशी, 25 मे रोजी ते नेहमीप्रमाणे मंत्रालय पत्रकार कक्षात कार्यरत होते. काम करतानाच संध्याकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. हा झटका अतिशय तीव्र स्वरूपाचा होता. यावेळी तिथे उपस्थित असलेले आरोग्यदूत पत्रकार दिपक कैतके यांना हृदयविकाराच्या धक्क्याची लक्षणे लगेच लक्षात आली. कैतके यांनी क्षणाचाही विलंब न लावता, तिथे उपस्थित पत्रकारांच्या मदतीने खासगी वाहनाने रफिक मुल्ला यांना जेजे रुग्णालयात नेले. तिथे त्यांना तात्काळ दाखल करवून घेण्याची व्यवस्था कैतके यांनी मंत्रालयातून निघताना वाटेतच संबंधितांशी फोनाफोनी करून मार्गी लावली होती. ज्येष्ठ पत्रकार राजा आदाटे तिथे व्हील चेअर व संबंधित कर्मचार्‍यांसह आधीच उपस्थित होते. जेजे रुग्णालयातील डॉक्टर्स आणि स्टाफने रफिक मुल्ला यांना तात्काळ दाखल करून घेत प्रथमोपचार दिले. तत्पूर्वी, प्राथमिक सर्व आरोग्यविषयक माहिती असलेल्या आरोग्यदूत दिपक कैतके यांनी अत्यवस्थ असलेले रफिक मुल्ला यांना व्यवस्थित झोपवून हाताने छातीवर विशिष्ठ पद्धतीने दाब देऊन सीपीआर प्रथमोपचार दिला होता. पुढील उपचारासाठी खासगी वाहनातून त्यांना जेजे रुग्णालयात नेण्यात आले. साधारणत: सायंकाळी चार वाजता डीन कार्यालयापाशी पोहोचताच रुग्णाला तातडीने चौथ्या मजल्यावर नेले गेले. उपचार सुरू होण्यापूर्वीच्या कालावधीत जेजे’तील डॉक्टर्स आणि स्टाफने सीपीआर देणे सुरूच ठेवल्याने याचा लाभ रुग्णाला पुरेपूर झाला. जेजे रुग्णालयात रफिक मुल्ला यांची तात्काळ अँजिओग्राफी केली गेली. मेजर ब्लॉकेज आढळल्याने त्यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करून हृदयातील ब्लॉकेज तात्काळ काढून टाकण्यात आले व उत्तम प्रतीचा स्टेंटही टाकण्यात आला. कुठलाही वेळ न घालवता अतिशय जलद गतीने ही सगळी प्रक्रिया पार पडली. सायंकाळी 4 वाजता दाखल रुग्णावर अवघ्या तासाभरात अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया केली गेली. अगदी विक्रमी वेळेत, योग्य उपचार मिळून पत्रकार रफिक मुल्ला यांना जीवदान मिळू शकले. यात जेजे रुग्णालय डॉक्टर्स आणि स्टाफबरोबरच आरोग्यदूत दिपक कैतके यांचीही भूमिका महत्त्वाची ठरली. मुल्ला यांना आलेल्या हृदयविकार झटक्याची लक्षणे ओळखण्यात व त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात जराही वेळ झाला असता तरी हा झटका त्यांच्या जीवावर बेतण्याची शक्यता होती. ऑन ड्युटी डॉ. कल्याण मुंडे आणि सहकारी स्टाफने ही शस्त्रक्रिया पार पाडली. या हृदय शस्त्रक्रियेनंतर आता रफिक मुल्ला यांची प्रकृती स्थिर व उत्तम आहे. त्यांना हृदय अतिदक्षता विभागात निगराणीत ठेवण्यात आले आहे. कुटुंब आणि मित्रपरिवार त्यांच्या सोबत आहेत. दरम्यान सदर पत्रकारावर योग्य उपचार करून प्राण वाचविणारे डॉ. कल्याण मुंडे हे मुळचे परळी येथील रहिवाशी आहेत. आयआरएस अधिकारी विश्‍वास मुंडे यांचे ते मोठे बंधू तर जिल्हाधिकारी दिपा मुधोळ- मुंडे यांचे ते दिर आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!