बीड । दि. 21 ।
बीड जिल्ह्यातील दिव्यांगांना मोफत सहाय्यक साधने उपलब्ध करून देण्यासाठी बीडच्या खासदार डॉ. प्रितमताई मुंडे यांनी केंद्र सरकारच्या एडीप योजनेअंतर्गत जिल्ह्यात मोफत दिव्यांग तपासणी शिबीर आयोजित केले आहे. या शिबिरातील पात्र लाभार्थ्यांना सहाय्यक साधने आणि उपकरणांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे.
केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालय व दिव्यांगजन सशक्तीकरण विभाग आणि गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली येत्या मंगळवारी बीड येथे जिल्हा रुग्णालयात या तपासणी शिबिराचा उदघाटन समारंभ संपन्न होणार असून खा.प्रितमताई मुंडे यांच्या शुभहस्ते शिबिराचे उदघाटन पार पडणार आहे. सदरील शिबीराचा शुभारंभ 23 मे रोजी बीड इथे तर समारोप 02 जून रोजी परळी इथे संपन्न होणार आहे.
नोंदणीसाठी आणायची कागदपत्रे
दिव्यांग बांधवांनी मोफत तपासणी शिबिराचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड, चाळीस टक्के पेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे शासकीय प्रमाणपत्र, बीपीएल राशन कार्ड किंवा उत्पनाचे प्रमाणपत्र ( प्रतिमहिना बावीस हजार पेक्षा कमी )
सदरील कागदपत्रे ही झेरॉक्स स्वरूपात आणायची असून तपासणी शिबिरात नोंदणी केल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना सहाय्यक साधने मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
या सहाय्यक साधनांचे होणार वाटप
दिव्यांग तपासणी शिबिरात केवळ नोंदणी आणि तपासणी करण्यात येणार असून तदनंतर संबंधित विभागाने आवश्यक साधने आणि उपकरणांची पूर्तता केल्यानंतर सहाय्यक साधनांचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. शिबिरातील पात्र लाभार्थ्यांना खालील प्रमाणे साधने मोफत वाटण्यात येतील.
व्हील चेअर, ट्रायसिकल, श्रवणयंत्र, कृत्रिम अवयव, स्टिक, एक्सिला क्लचस, एलबो क्लचस, एडीएल किट, सिपी चेअर, स्मार्ट कॅन,स्मार्ट फोन, ब्रॅडल कॅन,बेली किट.
••••