बीड, दि. 19 (लोकाशा न्यूज) : आपल्याला मिळालेल्या पदाचा पुर्णपणे वापर जनहितासाठी, शेतकर्यांसाठी करायचा असा दृढ निश्चिय बीडच्या कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी दिपा मुधोळ यांनी केलेला आहे. त्याअनुषंगानेच भविष्यातील पाण्याचं संकट लक्षात घेवून त्यांनी विहीरींच्या पुनर्भरणावर अधिक भर दिलेला आहे. या कामासाठी आता त्या सरसावल्या असून शुक्रवारी त्यांनी स्वत: काकडहिरा येथे जावून विहीर पुनर्भरणाच्या कामाला प्रत्यक्ष सुरवात केली आहे.
नैसर्गिक संकटामुळे कोणता हंगाम कसा जाईल, आणि त्याचा परिणाम कशा प्रकारे होईल, हे निश्चित सांगता येत नाही, वास्तविक पाहता येणार्या खरीप हंगामात पावसाचे प्रमाण घटणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे, याअनुषंगानेच बीड जिल्ह्याच्या कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी दिपा मुधोळ ह्या अत्यंत बारकाईने आपल्या जिल्ह्याची काळजी घेत आहेत. भविष्यात जिल्ह्यात पाण्याचे संकट भासू नये यासाठी त्यांनी पुनर्भरणावर अधिक भर दिला आहे. विहीरींची पाणी पातळी वाढविण्यासाठी पुनर्भरण आवश्यक आहे. याअनुषंगानेच त्यांनी महसूल, कृषी आणि झेडपीची यंत्रणा कामाला लावलेली आहे, विशेष म्हणजे त्या एवढ्यावरच न थांबता त्यांनी स्वत: फिल्डवर उतरून पुनर्भरणाच्या कामाला प्रत्यक्ष सुरवातही केली आहे. शुक्रवारी त्यांच्या शुभ हस्ते बीड तालुक्यातील काकडहिरा याठिकाणी विहीर पुनर्भरणाच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. जास्तीत जास्त शेतकर्यांनी आपल्या विहीरींचे पुनर्भरण करून घ्यावे, असे आवाहन यावेळी त्यांनी केले आहे. यावेळी त्यांच्यासमवेत बीड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आदित्य जीवने, उपजिल्हाधिकारी प्रियंका पाटील, नरेगाचे गटविकास अधिकारी डॉ. सचिन सानप, गटविकास अधिकारी अनिरुद्ध सानप यांच्यासह बीड पंचायत समितीच्या अधिकारी कर्मचार्यांची उपस्थिती होती.