परळी, दि. 18 (लोकाशा न्यूज) : परळीतील वैद्यनाथ साखर कारखान्याने आशिया खंडात नाव कोरलेले आहे, स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या नंतर या कारखान्याची धुरा पंकजाताईंच्या हाती आली, सध्या हा कारखाना प्रचंड प्रमाणात आर्थिक संकटात आहे, अशातच या कारखान्याची निवडणूक होत आहे, परिणामी शेतकर्यांचे हित लक्षात घेवून या कारखान्याला पुन्हा पुर्नजिवीत करण्यासाठी ही निवडणूक बिनविरोध काढण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्याअनुषंगानेच या कारखान्याची चेअरमन पदाची माळ पुन्हा पंकजाताईंच्या गळ्यात पडणार आहे. यावर स्वत: गुरूवारी पुण्यात माध्यमांशी बोलताना पंकजाताईंनी शिक्कामोर्तब केला आहे. आम्ही कारखान्याच्या हितासाठी एकत्र आलो असून पुन्हा कारखान्याला गतवैभव मिळवून देणार असल्याचे पंकजाताईंनी म्हटले आहे.
परळी तालुक्यातील पांगरी या ठिकाणच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर करण्यात आली. निवडणुकीसाठी 50 इच्छुक उमेदवारांचे अर्ज दाखल झाले होते. बुधवारी दिनांक 17 मे 2023 रोजी अर्जाची छाननी होती. छाननी अंति एकुन 50 अर्जांपैकी 37 मंजूर करण्यात आले तर 13 अर्ज नामंजूर करण्यात आले. तर दिनांक 18 मे 2023 ते 1 जून 2023 अर्ज मागे घेण्याची मुदत असून 2 जून 2023 ला चिन्ह वाटप करण्यात येणार आहेत. 11 जून 2023 रोजी मतदान तर 12 जून 2023 रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. बुधवारी वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या निवडणुकीत अर्ज मंजूर नामंजूर करण्यात आले आहेत. एकंदरीतच निवडणुकीची परिस्थिती पाहता कारखान्याच्या हितासाठी विद्यमान चेअरमन पंकजाताई मुंडे आणि माजी मंत्री तथा विद्यमान आमदार धनंजय मुंडे हे दोघे बहिण भाऊ एक विचाराने लढवणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे, 21 जागांपैकी 11 उमेदवार पंकजाताई मुंडे यांचे तर 10 उमेदवार आमदार धनंजय मुंडे यांचे असे निवडणूक विरोध निकाली काढण्याचे प्रयत्न होतांना दिसत आहेत. तर या कारखान्याची निवडणूक पुर्णपणे बिनविरोध होणार आणि पुन्हा एखदा या कारखान्याच्या चेअरमन पदाची जबाबदारी माझ्याकडेच येणार असल्याचे पंकजाताईंनी म्हटले आहे. आम्ही कारखान्याच्या हितासाठी एकत्र आलो आहोत, यामुळे कारखान्याला पुन्हा एखदा गतवैभव मिळणार असल्याचे पंकजाताईंनी म्हटले आहे.
कारखान्याला गतवैभव मिळणार
आम्ही कारखान्याच्या परिसरात लहानपणी बागडलो आहोत, सध्या हा कारखाना प्रचंड आर्थिक अडचणीत आहे, त्यामुळे पुन्हा या कारखान्याला पुर्नजिवीत करण्यासाठी आम्ही ही निवडणूक बिनविरोध काढत आहोत, यामुळे कारखान्याला पुन्हा एखदा गतवैभव मिळणार असल्याचे पंकजाताईंनी म्हटले आहे.