कडा / वार्ताहर
आष्टीसह अंमळनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अंधारात लावलेल्या वाहनातून डिझेल चोरी करून त्या डिझेलच्या विक्रीतून मौजमजा करणारे रॅकेट उघडकीस आले असून पोलिसांनी गुरूवारी सायंकाळी दोघांच्या मुसक्या आवळल्या तर अन्य एकजण फरार झाला. दोन चारचाकी वाहनासह, डिझेल चोरीसाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
याबाबत पोलीस सुत्रांकडून देण्यात आलेओली अधिक माहिती अशी की, आष्टी तालुक्यातील मातकुळी येथील मारूती राजेंद्र जरे, भाऊसाहेब आनंदराव आढाव व गोविंद पोपट शिरसाठ हे त्रिकुट चारचाकी वाहनाचा वापर करून अंधारात उभ्या केलेल्या ट्रक, टेम्पोसह अवजड वाहनातून डिझेल चोरी करुन त्या डिझेलच्या विक्रीतुन मिळालेल्या पैशातून मौजमजा करायचे. काकडे पाटील ट्रान्सपोर्टच्या एका ट्रक मधुन डिझेल चोरीचा दोन महिन्यापुर्वी आष्टी पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून पोलिस या आरोपींचा शोध घेत असतानाच, गुरूवारी आष्टी येथे एका विना क्रमांक वाहनाचा पोलिसांना संशय आला. याबाबत अधिक चौकशी करता त्या वाहनात मोकळे कॅन, डिझेल काढण्यासाठी लागणारे साहित्य आढळून आल्याने भाऊसाहेब आनंदराव आढव याला पोलिसांनी ताब्यात घेताच, त्यानंतर त्याने मारूती राजेंद्र जरे या साथीदाराचे नाव सांगताच, पोलिसांनी दुसर्या साथीदारालाही वाहनासह पकडले, तर अन्य तिसरा गोविंद पोपट शिरसाठ हा मात्र फरार झाला. पोलिसांनी दोन वाहनासह, मुद्देमाल जप्त करीत दोघांना अटक केली .शुक्रवारी न्यायालयासमोर हजर केले असता आरोपींना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सदर कारवाई पोलिस उपअधीक्षक अभिजीत धाराशिवकर, पोलीस निरीक्षक विजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजित चाटे, पोलिस उपनिरीक्षक नामदेव धनवडे, पोलिस हवालदार, विकास राठोड, वाणी, विलास गुंडाळे, गणेश राऊत, संतोष दराडे आदींनी केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव धनवडे करीत आहेत. वाहनातून डिझेल चोरी करणारे त्रिकुटाचे रॅकेट उघडकीस आणून पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
——-