Maharashtra Politics, NCP Leader Ajit Pawar: कारण नसताना माझ्याबाबत किंवा माझ्या सहकाऱ्यांबाबत गैरसमज जाणीवपूर्वक पसरवण्याचं काम होतंय, असं म्हणत अजित पवार यांनी राज्यात सुरू असलेल्या सर्व चर्चा पुन्हा एकदा फेटाळून लावल्या आहेत. माझ्याबाबत तुम्ही ज्या बातम्या पसरवताय त्या सर्व गोष्टींमध्ये काहीही तथ्य नाही, असंही अजित पवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी माध्यमांशी चर्चा केली.
दरम्यान, अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) 53 पैकी 40 आमदारांच्या सह्या घेतल्याचं वृत्त समोर आलं होतं. ‘द न्यू इंडियन एक्स्प्रेस’ या इंग्रजी वृत्तपत्राने ही बातमी दिली होती. सह्या मिळवण्यासाठी अजित पवार राष्ट्रवादीच्या आमदारांना फोन करत आहेत, असंही वृत्तात म्हटलं आहे. शिवाय यंदा शरद पवार हे सगळं थांबवण्याचा प्रयत्न करत नाहीत, असंही द न्यू इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तात म्हटलं आहे. 2019 साली अजित पवार यांचं बंड शरद पवार यांच्यामुळेच फसलं होतं. कारण अजित पवारांसोबत गेलेल्या सर्व आमदारांना थोरल्या पवारांनी स्वतः फोन केले होते. मात्र यंदा तसं काहीही होताना दिसत नाही.
नव्या समीकरणाच्या केवळ चर्चा : अजित पवार
अजित पवार यांनी हे वृत्त फेटाळलं आहे. “नव्या समीकरणांच्या फक्त चर्चा आहेत. यात काही तथ्या नाही. मी पुन्हा पुन्हा प्रतिक्रिया देणार नाही, मीडिया स्वतःच्या मनाने बातम्या चालवत आहे,” असं अजित पवार म्हणाले.
दरम्यान, गेल्या आठवड्यातही अजित पवार यांनी काही कार्यक्रम रद्द केले होते. तेव्हापासून अजित पवार भाजपसोबत जाणार अशा चर्चा सुरु झाल्या होत्या. रोखठोकमध्येही खुद्द शरद पवार यांच्या वक्तव्याचा आधार घेत पक्षांतरासाठी दबाव आहे, असं स्पष्टपणे लिहिण्यात आलं होतं. आता अजित पवार यांनी नव्या समीकरणाच्या चर्चा फेटाळल्या आहेत.