राजेंद्र जैन/ कडा
श्रीगोंदा तालुक्यातून एका अल्पवयीन मुलीला पळवून घेऊन चाललेला मजनू कडा येथील बसस्थानक परिसरात बुधवारी रात्री पेट्रोलिंग करताना पोलिसांना आढळून आला. सदर सैराट जोडपे हे श्रीगोंदा येथील असल्याची ओळख पटताच, येथील पोलिस कर्मचा-यांनी श्रीगोंदा पोलिसांशी संपर्क साधून आरोपीसह पीडीत मुलीला त्यांच्या ताब्यात दिले.
याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, आष्टी तलुक्यातील कडा येथे बुधवार दि. १ फेब्रुवारी रोजी रात्री दोन वाजेच्या सुमारास पोलिस कर्मचारी मंगेश मिसाळ हे दुचाकीवरून पेट्रोलिंग करीत होते. यावेळी येथील एसटी बसस्थानकात त्यांना प्रेमाचा गुलाबी ज्वर चढलेले एक सैराट झालेले मुलगा- मुलगी आढळून आले, म्हणून इतक्या रात्री काय करता, याची चौकशी केली. मात्र या सैराटांनी प्रेमाच्या धुंदीत पोलिसांनाच, उडवा-उडवीची उत्तरे दिली. त्यामुळे संशय अधिकच वाढल्याने मिसाळ यांनी सपोनि भाऊसाहेब गोसावी यांच्याशी संपर्क साधून या जोडप्याला चौकशी करण्यासाठी पोलिस चौकीला नेले. मग काय पोलिसांनी खाक्या दाखवताच सैराट मजनूने तोंड उघडले. आपले नाव ओम अप्पाससाहेब दांगडे (रा. गुगलवडगाव ता. श्रीगोंदा) येथील रहिवाशी असल्याचे सांगीतले. त्यानंतर सपोनि गोसावी यांनी श्रीगोंदा पोलिसांशी संपर्क करुन या जोडप्याबाबत विचारपूस केली असता, आरोपी ओम दांगडे याच्यावर श्रीगोंदा पोलिस ठाण्यात मुलीस पळून घेऊन गेल्याबाबत गुन्हा दाखल असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर पोलिसांकडून या सैराट जोडप्यास श्रीगोंदा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. आष्टीचे पोनि हेमंत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गोसावी ,पोलिस हवालदार संतोष नाईकवडे, पोशि मंगेश मिसाळ, सचिन गायकवाड यांनी कामगिरी केली आहे.
——%%—–