पुणे- नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तब्बल 44 उमेदवारांची लाखो रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.यापूर्वी टीईटी घोटाळ्यात परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांच्यावर कारवाई झाली होती,त्यानंतर आता दराडे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.
शिक्षण विभागात नोकरी लावण्याच्या आमिषाने बारा ते पंधरा लाख अशा स्वरूपात रकमा घेऊन नोकरी न लावता फसवणूक केल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त शैलजा रामचंद्र दराडे( रा.पाषाण) व त्यांचा भाऊ दादासाहेब रामचंद्र दराडे ( रा.इंदापूर) यांच्यावर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात 44 जणांची फसवणूक केल्याचे चौकशीमध्ये समोर आले आहे. याबाबत पोपट सुखदेव सूर्यवंशी ( रा. खाणजोडवाडी, आटपाडी, सांगली) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादी हे शिक्षक असून त्यांच्या नातेवाईक महिलेला शिक्षक पदावर नोकरी हवी होती. जून 2019 मध्ये दादासाहेब दराडे हे त्यांच्या संपर्कात आले त्याने शैलजा दराडे ह्या शिक्षण विभागात प्रशासकीय अधिकारी असल्याचे सांगितले. सूर्यवंशी यांच्या दोन नातेवाईक महिलांना शिक्षक पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून हडपसर येथे 12 आणि 15 लाख असे 27 लाख रुपये घेतले. परंतु नोकरी न लावल्याने फिर्यादीने पैसे मागितले तरीही त्यांनी पैसे परत केले नाही त्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अन्य 44 लोकांची देखील फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.















