बीड, दि.17 (लोकाशा न्यूज) : शिवजन्मोत्सवा निमित्त कल्पतरू बीड, सौ.के.एस.के. महाविद्यालय आणि कैलास कला निकेतन चित्रकला महाविद्यालय, बीड यांच्या संयुक्त विद्यमाने बीडमध्ये प्रथमच कल्पतरू चित्र-शिल्प महोत्सव बीड जिल्ह्यातील आंतर राष्ट्रीय किर्तीच्या चित्रकारांचे चित्रकला, शिल्प कलाचे भव्य प्रदर्शन, विक्री, प्रात्यक्षिक व स्पर्धाचे आयोजन करण्यात आले असून काल माजी मंत्री जयदत्त आण्णा क्षीरसागर यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन संपन्न झाले. याप्रसंगी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ललित कला विभाग प्रमुख डॉ. शिरीष आंबेकर प्रमुख उपस्थिती होती.
दि. 17 व 18 फेब्रुवारी दरम्यान बीड जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय किर्तीच्या चित्रकारांच्या चित्रांचे, शिल्पाचे भव्य प्रदर्शन तसेच प्रात्यक्षिक, विक्री आणि मोठ्या प्रमाणावर शालेय व महाविद्यालयातील खुलागट स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. असा उपक्रम बीड शहरात प्रथमच होत आहे. या प्रदर्शनात जवळपास 60चित्रकारांचे 200 चित्रांचे व शिल्पांची मांडणी करण्यात आली होती. या प्रदर्शनाचे उद्घाटन माजी मंत्री जयदत्त आण्णा क्षीरसागर यांच्या हस्ते दीप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी नवगण शिक्षण संस्थेचे सचिव तथा माजी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, माजी प्राचार्या डॉ. दीपाताई क्षीरसागर, युवा नेते डॉ.योगेश भैय्या क्षीरसागर, कल्पतरू च्या सचिव डॉ.सारिका क्षीरसागर, कैलास कला निकेतन चे प्राचार्य प्रवीण मुखेकर, के.एस. के. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.शिवानंद क्षीरसागर, दिनकर कदम, अरुण डाके, नानासाहेब काकडे, अॅड राजेंद्र राऊत, डॉ. संजय पाटील देवळानकर, चित्रकार श्रीकांत पुरी, प्रिती मिसाळ, सुजित गिराम, सारंग वाघमारे, श्रीकांत दहीवाळ, श्रीराम पुरी, राहूल राऊत, युवराज धोंगडे, अमित गाडे, सुहास पालिमकर तसेच नगरपालिकेचे नगरसेवक यांची उपस्थिती होती. उद्घाटनपर भाषणात माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, बीडच्या कलाकारांना प्रोत्साहन देऊन त्यातील हिरे माणिक एकत्र करून त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचे काम कल्पतरूच्या माध्यमातून होत आहे. चित्रकारांना बोलक्या स्वरूपात चित्र रेखाटताना कल्पनेच्या बाहेर जाऊन रेखाटावे लागते, आपली मुले ही बाहेर जिल्ह्यात राज्यात आणि देशात चमकणारी आहेत त्यांच्या पाठीवर थाप देऊन त्यांच्या कलागुणांची कौतुक करणे आवश्यक आहे. बीड जिल्ह्याच्या मातीतले हे मोती आहेत कमर्शियल आर्ट आता विस्तृत जालनात विस्तारले आहे प्रगत तंत्रज्ञानाने प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा निर्माण झाली आहे, यामुळे विद्यार्थ्यांच्या अंगी असणार्या कलांना ओळखून त्यांना व्यासपीठ निर्माण करून देण्याचे कार्य आवश्यक आहे असे ते म्हणाले. यावेळी डॉ सारिका क्षीरसागर यांनी प्रास्ताविकात कलाकारांनी कलात्मक व अनोख्या संकल्पना वापरून बनवलेली विविधांगी चित्रे व शिल्पाकृती, जीवनातील वास्तव त्यापासून होणारी भावनिक अनुभूती यांचे आगळेवेगळे दर्शन सर्वांना होणार आहे. या दोन दिवसांमध्ये या ठिकाणी चित्र शिल्पांचे प्रदर्शन त्यांची विक्री, प्रात्यक्षिक आणि स्पर्धा असे वैविध्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येणार आहेत. या प्रदर्शनामध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरविण्यात आलेल्या आणि प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या चित्रशिल्पांचा समावेश करण्यात आलेला आहे. यातील सर्व चित्रकार आंतरराष्ट्रीय दर्जाचे कलाकार आहेत. या प्रदर्शनाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. या भव्य अशा चित्र-शिल्प प्रदर्शन पाहण्यासाठी पत्रकार, नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बीड जिल्हा कलाकारांची खाण, आम्ही
कलाकारांच्या खंबीरपणे पाठीशी – डॉ.क्षीरसागर
बीड जिल्हा हा कलाकारांची खान आहे, या जिल्ह्यातील अनेक कलाकार आपल्या कलेतून बीड जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर लौकिक करत आहेत. यामध्ये अनेक चित्रकारांचाही समावेश आहे. या सर्वांच्या कलेला वाव, गती मिळावी, यासाठी आम्ही महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून हे प्रदर्शन भरवलेले आहे, याही पुढे त्यांच्या कलेला वाव मिळावी यासाठी आम्ही कलाकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असणार आहोत, असे डॉ. सारिका क्षीरसागर यांनी म्हटले आहे.















