Uncategorized

२६ जानेवारीपासून राज्यात २० हजार अंगणवाडी सेविकांनी होणार भरती, दहावी उत्तीर्णची अट रद्द होणार, आता सेविकेसाठी लागणार बारावी पास

मुंबई- राज्य शासनाच्या वतीने 26 जानेवारी पासून तब्बल 20 हजार अंगणवाडी सेविकांची भरती प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.यापूर्वी असलेली दहावी उत्तीर्ण ची अट आता बारावी उत्तीर्ण करण्यात आली आहे हे विशेष.

अंगणवाडी सेविका होण्यासाठी पूर्वीपासून दहावी उत्तीर्ण अशी अट होती. परंतु, अंगणवाड्यांमधील ७५ लाख विद्यार्थ्यांची दररोज ‘पोषण ट्रॅकर’ ॲपद्वारे माहिती भरताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे आता सेविकांच्या पदासाठी बारावी उत्तीर्ण असणे बंधनकारक असेल. त्यासंबंधीचा शासन निर्णय झाल्यानंतर भरती प्रक्रियेला सुरवात होणार आहे.

३० जानेवारीपूर्वी मदतनीस महिलांना शैक्षणिक पात्रतेनुसार सेविकापदी पदोन्नती दिली जाणार आहे. त्यानंतर इतर पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागणी, त्यांची यादी प्रसिद्ध करणे आणि त्यावर हरकती मागविण्यासाठी किमान २० ते २५ दिवस लागणार आहेत. विधवा, जातसंवर्ग, पूर्वीचा अनुभव आणि शैक्षणिक पात्रता, यावरून संबंधित पात्र उमेदवारांची थेट निवड केली जाणार आहे. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी (मे २०२३ पूर्वी) अंगणवाड्यांमधील २० हजार पदांची भरती केली जाईल, अशी माहिती एकात्मिक बाल विकास विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

बारावी उत्तीर्ण महिला, तरुणी सेविका म्हणून रुजू झाल्यास ‘पोषण ट्रॅकर’वर माहिती सहजपणे भरतील. मुलांच्या शिक्षणाकडेही विशेष लक्ष राहील आणि कुपोषण कमी होण्यास मदत होईल, हा शैक्षणिक पात्रता वाढीमागील हेतू असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

शिक्षक होण्याचे स्वप्न पाहून ‘डीटीएड’ केले, पण नोकरभरती नसल्याने ते स्वप्न अर्धवटच राहिले आणि अनेक मुलींचे विवाह झाले. राज्यात अशा लाखो तरुणी असून, त्यांना नोकरीची प्रतीक्षा आहे. त्यामुळे अंगणवाडी मदतनीस किंवा सेविका होऊन गावातच नोकरी करता येईल, या उद्देशाने आता पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या तरुणी तथा महिलांची संख्या अंगणवाडी भरतीत सर्वाधिक दिसेल, हे निश्चित आहे. त्यांनी आतापासूनच कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू केली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!