अंबाजोगाई(प्रतिनिधी)-येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रूग्णालयात बाह्य रूग्णालय कक्षाच्या स्वच्छता गृहात नवजात अर्भक प्रकरण उघडकीस येवुन देखील प्रशासनाने गांभीर्य घेतले नसल्याचे लक्षात येताच जिल्ह्याच्या खा.डॉ.प्रितम मुंडे यांनी काल अचानक सरप्राईज व्हिजिट देत दबंगगिरी दाखवताना रूग्णालय प्रशासन धारेवर धरले. या संपुर्ण प्रकरणाची तात्काळ चौकशी करावी शिवाय पोलीसांनीही वेगाने तपास करून सत्य बाहेर आणण्याच्या सुचना त्यांनी केल्या.दरम्यान एवढ्या मोठ्या रूग्णालयात बाहेरच्या महिला येवुन असा प्रकार करत असतील तर लाजीरवाणी गोष्ट आहे. या घटनेनंतर अनेक प्रश्न समोर येवु शकतात. सरप्राईज व्हिजिटमध्ये खासदारांनी एमआरआय मशिन विभागाची पहाणी करत लवकर कार्यान्वित करण्याच्याही सुचना केल्या.
बीड जिल्ह्याच्या खासदारांची ओळख दबंग खासदार म्हणुन यासाठीच म्हणावी लागेल.कारण एखाद्या प्रश्नावर कुणी लक्ष घालत नसेल तर तिथे खासदारांचा पाय पडल्याशिवाय रहात नाही. काल अचानक कुणाला कल्पना न देता रूग्णालयात त्यांच्या गाडीचा ताफा आला. थेट अधिष्ठाता कार्यालय गाठले. कारण कुणालाच कळत नव्हते. अनेक प्रश्नाची सरबत्ती त्यांनी रूग्णालय प्रशासनावर केली. चार दिवसापुर्वी अपघात विभागाच्या स्वच्छता गृहात बकेटाच्या पाण्यात स्त्री जातीचे नवजात अर्भक आढळुन आले होते. प्रसारमाध्यमात तशा बातम्याही प्रसिद्ध झाल्या. स्त्री भ्रुण हत्येसाठी बीड जिल्हा अगोदरच नकाशावर आलेला असताना हा प्रकार खरं तर गंभीर म्हणावा लागेल.या प्रश्नावर संतापजनक भावना बोलुन दाखवताना अधिष्ठाता डॉ.खैरे यांच्यासोबत चर्चा करून सविस्तर माहिती घेतली. रूग्णालय प्रशासनाने या संदर्भात पोलीसांत फिर्याद दाखल केल्याचे डॉक्टरांनी सांगितले. एवढ्यावर खासदार न थांबता थेट त्यांनी ज्या ठिकाणी अर्भक सापडले त्या जागेची स्पॉट पहाणी केली. तिथे सिसिटिव्ही फुटेज असुन ज्यात तीन महिला आत-बाहेर केल्याचे आढळुन आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अनेक प्रश्न तपासाच्या दृष्टीने समोर येताना अपघात विभागात या महिलांना आतमध्ये जाण्याची परवानगी दिली कशी? एवढेच नव्हे तर महिलांची हिंमत झाली कशी? पोलीसांनी तपास हाती घेतला असुन त्यांच्याकडूनही खासदारांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती आणि तपासाची गती जाणुन घेतली. बाकी काही असले तरी खासदारांनी संपुर्ण प्रकरणावर संताप व्यक्त करताना रूग्णालय प्रशासनही धारेवर धरले. एवढ्या मोठ्या नामांकित रूग्णालयात असे प्रकार घडतात कसे? असा सवाल त्यांनी विचारला.
एमआरआय मशिन पहाणी
खासदारांनी रूग्णालय परिसरात वेगवेगळ्या विभागात भेटी देवुन स्वत: पहाणी केली.नव्याने आलेल्या एमआरआय मशिन विभागालाही भेट देवुन कार्यान्वित कधी होणार? त्याला लागणारा टेक्निकल स्टाफ या संदर्भात विचारणा केली असता अधिष्ठाता डॉ.खैरेंनी या संदर्भात आम्ही संबंधित खात्याकडे पत्रव्यवहार केल्याचे सांगितले. केंद्र सरकारच्या वतीने ज्या योजना राबवण्यात येतात त्या सर्व खासदारांशी संबंधित असतात.त्या संदर्भात तात्काळ माहिती देण्याच्या सुचना त्यांनी केल्या. यावेळी भाजपाचे जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी, जेष्ठ कार्यकर्ते कमलाकर आण्णा कोपले, गणेशराव कराड, संजय गंभीरे, सचिन केंद्रे इत्यादीसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. खासदाराच्या अचानक भेटीने रूग्णालय प्रशासनाची धांदल उडाली. मात्र सर्व स्तरातुन खासदारांच्या भुमिकेचे कौतुक होवु लागले आहे. आशिया खंडातील एकमेव ग्रामीण रूग्णालय अशी ओळख असलेल्या रूग्णालयात अर्भक सापडणे तेही स्त्री जातीचे गंभीर प्रकरण आहे हे मात्र नक्कीच.