बीड, दि. 27 (लोकाशा न्यूज) : केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनाप्रमाणे केंद्राच्या योजनांचा लाभ घेणार्या सर्व लाभार्थींचे आधार नोंदणी करून आधार सलग्नीकरण करण्याच्या प्रक्रियेसाठी 30 डिसेंबर 2022 ची कालमर्यादा देण्यात आली आहे. यासाठी बीड जिल्ह्यातील शुन्य ते सहा वर्षे वयोगटातील लाभार्थींचे आधार नोंदणी युध्दपातळीवर सुरू आहे. आधार नोंदणीसाठी आधार सेवा केंद्र, पोस्ट ऑफीस व महिला व बालविकास विभागाच्या वतीने विविध ठिकाणी आधार नोंदणीचे केंद्र कार्यान्वीत करण्यात आले आहेत. तरी आपला बालक महिला बालविभागाच्या योजना व संदर्भ सेवा यांच्यापासून वंचित राहू नये यासाठी आपल्या बालकाची आधार नोंदणी करून घेण्याचे आवाहन महिला व बालविकास विभाग जिल्हा परिषदेचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी चंद्रशेखर केकाण यांनी केले आहे. ज्या बालकांना आधार नोंदणीसाठी जन्माचा दाखला आवश्यक आहे त्यांनी आपल्या गावातील ग्रामसेवकाशी संपर्क करावा व आपल्या बालकाची आधार नोंदणी करून घ्यावी, जेणे करून आपल्या बालकास सर्व योजना व संदर्भ सेवाविना खंड मिळतील, असे श्री.केकाण यांनी म्हटले आहे.