अंबाजोगाई, दि. 23 (लोकाशा न्यूज) : स्वतःच्या कंपनीच्या माध्यमातून अधिक परताव्याचे आमिष दाखवून पती-पत्नीने एका कर्ज सल्लागारास तब्बल साडे अठरा लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी त्या दांपत्यावर अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याप्रकरणी केज येथील कर्ज सल्लागार सुहास दैवानराव मस्के (रा. भीमनगर, केज) यांच्या फिर्यादीनुसार, गणेश राजाराम भिसे आणि त्याची पत्नी पूजा (दोघेही रा. विवेकानंद नगर, अंबाजोगाई) यांनी त्यांच्या कंपनीचे अंबाजोगाईतील भगवानबाबा चौकात कार्यालय थाटले आहे. या दांपत्याने त्यांच्या स्वराज्य जि.आर.बी. इंडस्ट्रीज प्रा.लि. या काढलेल्या कंपनीबाबत सुहास मस्के यांना खोटी माहिती दिली व कंपनीत गुंतवणूक केल्यास जादा परताव्याचे आमिष दाखविले. त्यांच्या आग्रहामुळे मस्के यांनी सदर कंपनीत तब्बल 33 लाख रुपये गुंतविले. त्यानंतर भिसे दांपत्याने काही दिवसात मस्के यांना परताव्यापोटी 14 लाख 35 हजार 500 रुपयांची रक्कम दिली. मात्र नंतर उर्वरित रक्कम देण्यास टाळाटाळ सुरु केली. अनेकदा मागणी करूनहि भिसे दांपत्याने मस्के यांची 18 लाख 64 हजार 500 रुपये मुद्दल रक्कम परत केली नाही. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मस्के यांनी पोलिसात धाव घेतली. त्यांच्या फिर्यादीवरून गणेश आणि पूजा भिसे या दोघांवर अंबाजोगाई शहर ठाण्यात कलम 420, 34 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक गव्हाणे करत आहेत. दरम्यान, अद्याप आरोपींना अटक झालेली नाही.