अंबाजोगाई । दिनांक ११।
जैविक शेतीतून जसं चांगलं उत्पादन होतं तसं राजकारणात स्वार्थ बाजूला सारून आणि लोकांचं हित समोर ठेवून काम केल्याशिवाय देशाचं, जगाचं भलं होणार नाही असं प्रतिपादन भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी येथे केलं. शेती उत्पादन वाढविण्यासाठी जैविक शेतीला सरकारने प्रोत्साहित करण्याची गरज असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
गिरवलीचे भूमिपुत्र आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात कार्यरत असलेले विभाग प्रमुख डाॅ. कल्याणराव आपेट यांचा आज गिरवली येथे पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते एकसष्ठी निमित्त हृदय सत्कार करण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजप नेते नंदकिशोर मुंदडा तर प्रमुख पाहूणे म्हणून डाॅ. ए. पी. सूर्यवंशी, शामराव आपेट, डाॅ. ठोंबरे, जान मोहम्मद पठाण, गोविंदराव कुलकर्णी, अच्युत गंगणे, राम कुलकर्णी आदी उपस्थित होते.
मातीला जातीचं बंधन नसतं, कसेल त्याची शेती असते. एखादा व्यक्ती चांगली डिग्री घेऊन कृषी विद्यापीठातून शेतीवर संशोधन करत असेल त्याचा फायदा शेतकऱ्यांना होतो, कल्याणराव यांनी सुध्दा यांनी तेच केलं, या गावचं नाव त्यांनी देशात केलं अशा शब्दांत पंकजाताईंनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. अशी माणसे राजकारणात यावीत जे स्वतःचा विचार न करता समाजाच्या हिताचा विचार करतील तरच देश व समाज घडेल. लोकनेते मुंडे साहेबांनी मला लोकांची सेवा करण्यासाठीच राजकारणात आणलं. वंचित, पिडितांकडे दुर्लक्ष करू नको असं मला त्यांनी सांगितलं होतं आणि त्याच विचारावर आज मी चालत आहे असं पंकजाताई म्हणाल्या.जगाला अन्न पुरवठा करू शकेल एवढी ताकद बळीराजांमध्ये आहे. बळीराजाचं चित्र बदलेल, रूप बदलेल पण त्याची पुण्याई कधीच बदलणार नाही, त्याच्या भल्यासाठी सर्वांनी पुढं आलं पाहिजे असं त्या म्हणाल्या.
पंकजाताईंनी याप्रसंगी डाॅ. कल्याणराव आपेट यांचा हृद्य सत्कार केला, यावेळी त्यांच्या हस्ते सेवानिवृत्त ज्येष्ठ मान्यवर, गुणवंत विद्यार्थी, यशस्वी उद्योजक व अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
••••