परळी वैजनाथ ।दिनांक ०४।
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी परळी मतदारसंघातील विविध विकास कामासंदर्भात काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. वैद्यनाथ मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखडयास गती देऊन उज्जैनच्या धर्तीवर वैद्यनाथ कोरिडाॅर निर्माण करून विकास करावा अशी मागणी त्यांनी केली. या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे त्यांनी सांगितले.
पंकजाताई मुंडे यांनी गुरूवारी मुख्यमंत्री शिंदे यांची निवासस्थानी भेट घेतली. आमदार माधुरीताई मिसाळ हया देखील त्यांच्यासमवेत होत्या. बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथ मंदिराचा सर्वांगीण विकास आणि भाविक भक्तांची सोय होण्याच्या दृष्टीने मंदिर परिसराचा विकास आराखडा मंजूर होणे आवश्यक आहे. यापूर्वी सन २०१९ मध्ये १३३ कोटी ५८ लाख रूपयांचा विकास आराखडा मंजूर झालेला होता, त्याअंतर्गत ३५ कोटीचा निधी पुरवणी मागणीद्वारे मंजूरही झाला पण नंतर मात्र निधी न मिळाल्याने कामे पूर्ण होऊ शकली नाहीत परिणामी मंदिर परिसराचा विकास झाला नाही ही बाब पंकजाताईंनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणुन दिली. मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशातील काशी विश्वनाथ, उज्जैन महाकाल मंदिराचा कोरिडाॅर निर्माण करून जसा विकास केला अगदी त्याच प्रमाणे प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचा देखील कोरिडाॅर निर्माण करून विकास करावा अशी मागणी त्यांनी केली. आहे. यावेळी मतदारसंघातील विविध विकास कामासंदर्भातही चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे त्यांनी सांगितले.
••••