मुंबई : राज्यात दिवाळीनंतर निवडणुकांचे पडघम वाजणार आहेत. २५ जिल्हा परिषदा, २३ महापालिका, २२० नगरपरिषदा व नगरपालिका आणि २८४ पंचायत समित्यांची मुदत ७ महिन्यांपूर्वीच संपली आहे. पण प्रभागरचनेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्याच दरम्यान आता पुढील दीड महिन्यांत तब्बल ७ हजार ६०० ग्रामपंचायतींची मुदत संपणार आहे. त्यामुळे दिवाळीनंतर नोव्हेंबरअखेरीस ग्रामपंचायत निवडणुकीचा पहिला टप्पा होण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने तसे नियोजन केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
राज्यातील बहुतांश महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या, नगरपालिकांची मुदत मार्च २०२२ पर्यंत संपलेली आहे. मात्र, ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न कोर्टात असल्याने या निवडणुका ६ महिने पुढे ढकलण्यात आल्या आहेत. दरम्यान, आरक्षणाचा मुद्दा निकाली निघाला. मात्र, तत्कालीन सरकारने प्रभाग रचनेत केलेल्या बदलाला राज्य सरकारने आव्हान दिले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाने स्थानिक स्वराज्य संस्थांवरील प्रशासकांना निवडणूक होईपर्यंत मुदतवाढ दिली.
२०११ च्या जनगणनेऐवजी सध्याची संभाव्य लोकसंख्या विचारात घेऊन प्रभाग रचनेत बदल करण्यात आला व प्रभाग रचनाच बदलली. त्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात १९ ऑक्टोबरला सुनावणी पार पडली. न्यायालयाने दोन आठवड्यांची मुदत दिल्याने नोव्हेंबरच्या मध्यात सुनावणी होईल. त्यादरम्यान ग्रामपंचायतींची मुदत संपणार आहे. या दरम्यानच साडेसात हजार ग्रामपंचायतीची निवडणूक होऊ शकते, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली. सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यांत घेतल्या जाऊ शकतात, असेही सूत्रांचे म्हणणे आहे.
निवडणुकांचे संभाव्य ३ टप्पे
ग्रामपंचायतीसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यांत होणार असून, २० नोव्हेंबर ते १५ डिसेंबरदरम्यान ग्रामपंचायत निवडणुका होऊ शकतात. २० डिसेंबर ते २५ जानेवारीदरम्यान महापालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुका, तर ३० जानेवारी ते २० फेब्रुवारीदरम्यान जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका होऊ शकतात, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.