Uncategorized

नियमित कर्ज भरणार्‍या शेतकर्‍यांची दिवाळी होणार गोड, पन्नास हजारा हजाराचे प्रोत्साहनपर अनुदान मिळणार, पात्र शेतकऱ्यांनी तात्काळ आधार प्रमाणिकरण करावे, जिल्हाधिकार्‍यांचे आवाहन

बीड, दि. 13 (लोकाशा न्यूज) : बीड जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवाना कळविण्यात येते की , महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय दि. 29 जुलै 2022 अन्वये महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत अल्पमुदत शेतकर्‍यांनी नियमितपणे परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना 50 हजार रूपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याच्या योजनेस मान्यता दिलेली आहे. नियमित कर्जपरतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी सन 2017-18, 2018 19 आणि 2019-20 हा कालावधी विचारात घेण्यात येणार असून या तीन आर्थिक वर्षापैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करुन नियमित परतफेड केलेल्या शेतकर्‍यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. बीड जिल्ह्यामध्ये या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, सर्व राष्ट्रीयकृत व खासगी बँकांनी या योजनेत पात्र असलेल्या खातेदारांची माहिती शासनाचे ऑनलाईन पोर्टलवर भरणा केलेली आहे. या योजनेत पात्र असलेल्या शेतकर्‍यांची विशिष्ट क्रमांकासह (व्ही के लिस्ट) पहिली यादी दि . 13 ऑक्टोबर 2022 रोजी प्रसिध्द झालेली आहे. पहिल्या यादीत नांव न आल्यामुळे या योजनेत पात्र असलेल्या शेतकर्‍यांनी घाबरून जाण्याचे काही कारण नाही. उर्वरित पात्र शेतकर्‍यांची दुसर्‍या टप्यातील यादी लवकरच प्रसिध्द होणार आहे. विशिष्ट क्रमांकासह यादी संबंधीत बँक शाखा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायत कार्यालयाचे सूचना फलक, जिल्हा उपनिबंधक कार्यालय तसेच तालुका सहाय्यक निबंधक कार्यालयात प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. विशिष्ट क्रमांकासह यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यातील शेतकर्‍यांनी संबंधीत बँकेत किंवा सेवा केंद्रामध्ये जाऊन आधार प्रमाणीकरण करावयाचे आहे. प्रमाणिकरणानंतर पात्र लाभार्थ्यांची प्रोत्साहनपर लाभाची रक्कम त्यांच्या बँकेच्या सेव्हिंग खात्यावर जमा होणार आहे. आधार प्रमाणीकरणासाठी गेल्यानंतर त्यांचा आधार क्रमांक किंवा त्यांच्या कर्जाची रक्कम अमान्य असेल, तर त्याबाबत त्या शेतकर्‍याने तशी तक्रार संबंधित पोर्टलवर नोंदवावयाची आहे. अशा प्राप्त होणार्‍या तक्रारीचे निवारण करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकार्‍यांच्या तर तालुकास्तरावर संबंधित तालुक्याचे तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समितीची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तरी जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थी शेतकर्‍यांनी महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर अनुदान योजनेचा लाभ घेणेसाठी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र, सामुदायिक सेवा केंद्रावर अथवा संबंधित बँक शाखेत जाऊन आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, बीड व बीड सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक सर्मथ जाधव यांनी केले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!