बीड, दि. 10 (लोकाशा न्यूज) : दोन दिवसांपुर्वी पाळत ठेवून एका सराफाला लुटल्याची घटना बीडपासून काही अंतरावर घडली होती. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत चार दरोडेखोरांना ताब्यात घेतले तर एकाच्या मार्गावर पथक असून लवकरच त्याच्याही मुसक्या बांधल्या जाणार आहेत.
शिरूर तालुक्यातील खोकरमोहा येथील सचीन उद्धव टाक यांचे बीड शहरात दागिन्याचे दुकान आहे. ते रोज बीड ते खोकरमोहा असा प्रवास करतात. त्यांच्या प्रवासाची संपुर्ण माहिती, वेळ घेऊन दरोडेखोरांनी त्यांना लुटण्याचा प्लॅन आखला होता. त्यानंतर शिरूर ते खोकरमोहा रोडवरील कृषी महाविद्यालयाजवळ दबा धरून बसलेल्या दरोडेखोरांनी त्यांच्या दुचाकीवर अंधाधूंद दगडफेक करत त्यांच्याकडील सोन्या-चांदीची बॅग हिसकावून पळ काढल्याची घटना शुक्रवारी संध्याकाळी घडली होती. या प्रकरणी सराफा टाक यांनी बीड ग्रामीण पोलिसात तक्रार दिल्यानंतर ठाणेप्रमुख संतोष साबळे यांनी पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलीस अधिक्षक सुनील लांजेवार, डीवायएसपी संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे फिरवत पथके तयार करून अवघ्या दोन दिवसात चार दरोडेखोरांच्या मुसक्या बांधल्या. यातील मुख्य सुत्रधार अद्यापही फरार असून पोलीस त्याच्या मागावर आहेत. हे दरोडेखोर नवगण राजुरी, उखंडा परिसर आणि बीड शहरातून ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई एपीआय योगेश उबाळे, पीएसआय पवन राजपूत यांच्यासह बीड ग्रामीण पोलिसांनी केली.