बीड । दिनांक ०४।
दसरा मेळाव्याची परंपरा पुढे सुरू ठेवण्यासाठी शांततेत, वाहने हळू चालवत, घरची भाकरी, चटणी शिदोरी आणि पाण्याची बाटली घेऊन स्वतःची काळजी घेत भगवान भक्तीगडावर वेळेत या, असं आवाहन भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केलं आहे. दरम्यान, उद्या दसरा मेळाव्यानिमित्त भगवान भक्तीगडावर लाखोंचा जनसागर उसळणार असून तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पंकजाताई मुंडे यांनी फेसबुकच्या माध्यमातून सर्वांना या मेळाव्याला येण्याचे आवाहन करतांना काही सूचना देखील केल्या आहेत. पंकजाताई मुंडे यांनी दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर समर्थकांना काळजी घेण्याचे आवाहन करतांना म्हटले आहे, की सावरगावचा दसरा मेळावा ही आपली परंपरा पुढे कायम ठेवण्यासाठी तुम्ही आणि मी देखील उत्सूक आहे.गेल्यावेळी हेलीकाॅप्टरमुळे थोडा उशीर झाला होता, यावेळी मात्र तसे काहीही होणार नाही. तुम्ही मोठ्या संख्येने येणार आहात याची मला कल्पना आहे. अहवालानूसार यंदा ३० ते ३५ टक्के जास्त गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमची मोठी बहिण म्हणून आणि बहिणीला आई मानतात या अधिकाराने मी तुम्हाला काही सूचना सांगणार आहे. तुम्ही त्या पाळाल याची मला खात्री आहे.
मेळाव्याला येतांना घरून आपली भाकरी, चटणीची शिदोरी सोबत घेऊन या. सोबत पाण्याची बाटली, त्यासोबतच साखर, मीठ मिसळून तयार केलेल्या पाण्याची दुसरी बाटली आणि साखर देखील आपल्या सोबत ठेवा. ऊन प्रचंड असणार आहे, त्याच्यापासून बचाव करण्यासाठी गमचा, टोपी, स्कार्फ आणायला विसरू नका.
वाहने वेगाने चालवू नका, शातंतेने या, १० ते ११ वाजे दरम्यान प्रांगणात बसता येईल यादृष्टीने तयारी ठेवा. वाहनांनी येतांना आपली वाहने योग्यरितीने पार्क करा जेणेकरून येणाऱ्या इतर वाहनांची व नागरिकांची गैरसोय होणार नाही. दसरा मेळावा आपल्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करायचा आहेच, पण त्यासोबतच काळजी देखील घ्यायची आहे, असे आवाहन देखील पंकजाताई मुंडे यांनी केले.
गोपीनाथगड ते भगवानभक्तीगड ; खा.प्रितमताईंची भव्य रॅली
परंपरेप्रमाणे खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या नेतृत्वात दसरा मेळाव्यानिमित्त गोपीनाथ गड ते भगवान भक्तीगड अशी भव्य रॅली निघणार आहे.गोपीनाथगड येथे सकाळी ६ वा. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या दर्शनानंतर खा.प्रितमताई मुंडे यांची रॅली सावरगाव घाटकडे मार्गस्थ होणार आहे.
••••