परळी ।दिनांक २६।
भाजपाच्या राष्ट्रीय सचिव म पंकजाताई मुंडे यांची सर्वस्तरातील लोकप्रियता सर्वज्ञात आहे. चिमुकल्या बालकांपासून ते वयोवृद्धापर्यंत पंकजाताई लोकप्रिय नेत्या म्हणून परिचित आहेत. लोकांमध्ये मिसळण्याच्या बाबतीत आणि लोकांना आपलंसं करण्याच्या बाबतीत त्या नेहमीच अग्रेसर असतात. विशेष म्हणजे त्यांना स्वतःला अतिशय संवेदनशीलपणे व सकारात्मकतेने लोकांना भेटणे, त्यांच्यात मिसळणे आवडते. विविध कार्यक्रम, प्रसंग व वेगवेगळ्या ठिकाणी याचा नेहमीच अनुभव येतो. असाच एक अनुभव आज परळीमध्ये बघायला मिळाला.
पंकजाताई मुंडे या परळी शहरातून जात असताना छत्रपती शिवाजी महाराज चौकात होत्या. त्याचवेळेला समोरून एका शाळेची स्कूल बस जात होती. पंकजाताईंना पाहून या स्कूलबसमधील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी “ताई, ताई “म्हणून आवाज दिला व सर्वांनी ताईंना हात उंचावत अभिवादन केले. या विद्यार्थ्यांचा उत्साहच इतका ओसंडून वाहत होता की पंकजाताईनाही त्यांच्यात सहभागी होण्याचा मोह आवरता आला नाही. पंकजाताईंनी त्या स्कूलबस मधील प्रत्येक विद्यार्थ्यांशी हस्तांदोलन करत त्यांना प्रोत्साहित केले. परंतु या स्कूलबस मधील सर्वच विद्यार्थ्यांचा प्रत्येकाला ताईंशी हस्तांदोलन करण्याचा मनोमन आग्रह दिसून आल्याने या चिमुकल्यांचा हट्ट पुरवत पंकजाताईंनी चक्क स्कूल बस मध्येच प्रवेश केला. सर्व विद्यार्थ्यांसमवेत या स्कूल बस मध्ये बसून काही अंतर त्यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळ्या गप्पा मारत प्रवासही केला. या विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करत प्रत्येकाची चौकशी करत या चिमुकल्यांचा उत्साह वाढवला.
••••