Uncategorized

बीड जिल्ह्यातील जलजीवनचे कामे चौकशीच्या फेर्‍यात, पंकजाताईंच्या तक्रारीनंतर पाणी पुरवठा मंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश


बीड, दि. 15 (लोकाशा न्यूज) : बीड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या जल जीवन मिशन योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि अनियमितता झाल्याची तक्रार भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा माजीमंत्री पंकजाताई मुंडे यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केली आहे. मुंडे यांच्या तक्रारीची तातडीने दखल घेत पाटील यांनी या सर्व प्रकरणाची मंत्रालयीन पातळीवरून उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
बीड जिल्ह्यात जल जीवन मिशन योजनेत ठराविक गुत्तेदारांना दहा वीस कामे वाटून कोट्यवधी रुपयांची खैरात दिली असल्याची तक्रार
करण्यात आली आहे. टेंडर क्लार्कने आपल्याच घरात 40 कोटींची कामे वाटली आहेत. विशेष म्हणजे निखिल चव्हाण,जालिंदर डावकर,प्रशांत चव्हाण,शशिकांत कोटुळे, जगदंबा कन्स्ट्रक्शन, मोहिनीराज कन्स्ट्रक्शन, आरोही सोल्युशन यासह इतर गुत्तेदारांना 300 पेक्षा अधिक कामे वाटप करण्यात आली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याबाबत माध्यमांनी वाचा फोडल्यानंतर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी थेट पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी दूरध्वनी वरून चर्चा करून तक्रार केली. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी मंत्री पाटील यांची भेट घेऊन पंकजाताईंची तक्रार दिली. यावर मंत्री पाटील यांनी तातडीने या सर्व प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मंत्रालयीन पातळीवर उच्चस्तरीय चौकशी समिती नियुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. मंत्रालयीन पातळीवरून चौकशी होणार असल्याने आता यामध्ये नेमके कोण कोण अडकते हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!