Uncategorized

भाजीपाला विक्रीसाठी जाणाऱ्या बाप-लेकाचा कारच्या धडकेत मृत्यू, बारामती-पैठण मार्गावरील खाकाळवाडी शिवारात भीषण अपघात

कडा / वार्ताहर

तालुक्यातील बारामती-पैठण मार्गावरील खाकाळवाडी शिवारात भाजीपाला विक्रीसाठी दुचाकीवरून जाणाऱ्या बाप-लेकाचा समोरुन भरधाव आलेल्या कारने दिलेल्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. या भीषण अपघातात वडील अरूण बापूराव औटे (वय-५४) आणि मुलगा सुरज अरूण औटे (वय-२४) अशी मृतांची नावे आहेत.

आष्टी तालुक्यातील नांदा येथील अरूण बापूराव औटे व सुरज अरूण औटे हे शेतकरी पितापुत्र दोघेही शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे शेतातील भाजीपाला विक्रीसाठी नांद्यावरुन कड्याकडे दुचाकीवरून येत होते. याच दरम्यान, कड्याकडून मिरजगावकडे जाणार्‍या (एम.एच.जीयु-९९६७) असा क्रमांक असलेल्या आय-२० अॅक्टिव्ह या समोरुन भरधाव येणा-या कारची आणि दुचाकीची बारामती-पैठण मार्गावरील खाकाळवाडी शिवारात समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात दुचाकीवरील बाप-लेकाचा गंभीर दुखापत होऊन जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सकाळी घडली. या अपघाताची माहिती मिळताच कडा पोलिस चौकीच्या कर्मचा-यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदत केली. सर्वसामान्य शेतकरी कुटूंबातील दोघाही कर्त्या पितापूत्राचा अपघातात मृत्यू झाल्याने औटे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
——-%%——-

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!