बीड, दि. 22 (लोकाशा न्यूज) : अहमदनगर-बीड-परळी या रेल्वेमार्गाकरिता राज्य शासनाने स्वतःच्या हिश्याचे 150 कोटी रूपये सोमवारी वितरित केले. या निर्णयाबद्दल भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे आणि बीड जिल्ह्याच्या खा. डॉ. प्रीतमताई मुंडे यांनी सरकारचे आभार मानत या निधीमुळे रेल्वेमार्गाच्या कामाला अधिक गती येईल, असे म्हटले आहे.
नगर-बीड-परळी या 261.25 किमी लांबीच्या रेल्वेमार्गाचा अंदाजित खर्च 2826 कोटी रूपये इतका होता. प्रकल्पाच्या खर्चात केंद्र व राज्य सरकारचा हिस्सा पन्नास-पन्नास टक्के इतका असल्याने राज्य हिस्सा 1413 कोटी रूपये इतका होता. शासन निर्णयानुसार 4508.17 कोटी रूपये इतक्या अंदाजित खर्चास राज्य शासनाने दुसरी सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. प्रकल्पाच्या खर्चापैकी रूपये 2402.59 कोटी एवढा पन्नास टक्के हिस्सा शासन मध्य रेल्वेला देणार आहे. 31 मार्च 2022 अखेर राज्य सरकारने 1413 कोटी रूपये इतका निधी दिला असून हिश्याचे समप्रमाण राखण्यासाठी सन 2022-23 करिता 150 कोटी रूपये इतका निधी राज्याने सोमवारी मध्य रेल्वेकडे वर्ग केला आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्यानंतर पंकजाताई मुंडे व खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी वेळोवेळी केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करून या मार्गासाठी निधी खेचून आणला आहे. सोमवारी राज्याने 150 कोटीचा निधी दिल्याबद्दल मुंडे भगिणींनी आभार सरकारचे आणि अभिनंदन बीड जिल्ह्याचे !! असं ट्विट करत सरकारचे आभार मानले आहेत. खा. प्रीतमताई मुंडे यांनी व्टिटव्दारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहे.