Uncategorized

आरक्षण अंतिम; ग्रा.पं.सातशे सतरा, कोणाला खतरा, 717 ग्रामपंचायतची अंतिम प्रभाग रचना जिल्हाधिकार्‍यांनी केली प्रसिध्द, आता निवडणुकांकडे नजरा

बीड, दि.17 (लोकाशा न्युज) ः जिल्ह्यातील डिसेंबर 2022 अखेरपर्यंत मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींचे प्रभागनिहाय आरक्षण सोडत कार्यक्रम निवडणूक आयोगाने हाती घेतलेला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील 717 ग्रामपंचायतच्या प्रभागाचे आरक्षण जाहिर करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी शर्मा यांच्या आदेशानुसार तालुकास्तरावरून काल दि.17 ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील 717 ग्रामपंचायतची अंतिम प्रभाग रचना प्रसिध्द करण्यात आली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील सातशे सतरा ग्रामपंचायतच्या प्रभागाचे आरक्षण जाहिर झाल्यानंतर आता होणार्‍या निवडणुकांमध्ये कोणाचा विजय तर कोणाला खतरा होणार? या पाहण्यासाठी सर्वांच्या नजरा निवडणुकांकडे लागल्या आहेत.

जिल्ह्यातील केज, बीड, अंबाजोगाई, धारूर, परळी, वडवणी, शिरूर, आष्टी, पाटोदा, माजलगांव, गेवराई या अकरा तालुक्यातील 717 ग्रामपंचायतची मुदत डिसेंबर 2022 अखेरपर्यंत संपत आहे. त्याअनुषंगाने निवडणूक आयोगाकडून कामकाज सुरू आहे. निवडणूक आयोगाने आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहिर केल्यानुसार दि.26 जुलै रोजी आरक्षणाची सोडत काढण्याकरिता विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली दि.29 जुलै रोजी आरक्षण सोडत काढण्यात आली. सोडतीनंतर दि.1 ऑगस्ट रोजी प्रभागनिहाय आरक्षणाची प्रारूप प्रसिध्द करण्यात आली. दि. 3 ऑगस्टपर्यंत हरकती मागविल्यानंतर ज्या-त्या उपविभागीय अधिकार्‍यांनी हरकती विचारात घेवून 10 ऑगस्टपर्यंत अभिप्राय दिला. त्यानंतर काल दि.17 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार संबंधित तालुकास्तरावरून अंतिम प्रभाग रचना प्रसिध्द करण्यात आली आहे. त्यानुसार आता जिल्ह्यातील 717 ग्रामपंचायतमधील प्रभागाचे आरक्षण अंतिम झाले आहे.

निवडणुकीचा बार कधी ?
दरम्यान, डिसेंबर 2022 अखेर मुदत संपणार्‍या जिल्ह्यातील 717 ग्रामपंचायतच्या प्रभागाचे आरक्षण नुकतेच अंतिम झाले आहे. अद्याप प्रत्यक्ष निवडणुकीचा कोणताही कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहिर केलेेले नाही. त्यामुळे निवडणुकांचा बार कधी वाजणार यासाठी आणखी काही प्रतिक्षा करावी लागणार आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!