बीड । दि. १३ ।
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत बीड शहरात आयोजित भव्य तिरंगा रॅलीने बिडकरांमध्ये राष्ट्रभक्तीची नवचैतना संचारल्याच्या विहंगमय दृश्याची अनुभूती काल अनेकांना बघण्यास मिळाली.हजारो राष्ट्रभक्तांच्या सहभागाने तिरंगा रॅलीची भव्यता आणि भारतमातेच्या जयघोषासह ‘वंदे मातरम’ चा नारा आसमंत दुमदुमून टाकत होता. “ना धर्म का अहंकार, ना जाती का की गुहार ये मेरे बीड की देशभक्ती की हुंकार” अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया रॅली संपन्न झाल्यानंतर खा.प्रितमताई मुंडे यांनी दिली.
स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरी निमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘हर घर तिरंगा अभियान’ अंतर्गत बीड शहरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्याच्या खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांच्यासह हजारो राष्ट्रभक्त नागरिक रॅलीत सहभागी झाले होते. तसेच माजी सैनिक, परिचारिका, विद्यार्थी-विद्यार्थिनी, जेष्ठ नागरिकांनी ही रॅलीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.याप्रसंगी महापूरुषांच्या वेशभूषेतील चिमुकले सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.
भारत भूमीवर जन्म घेतलेल्या प्रत्येकाने स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करावा
आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्षे पूर्ण झाली आहेत, स्वातंत्र्याचा हा अमृत महोत्सव पक्ष, जात,धर्म म्हणून नाहीतर या मातीत आणि भारत भूमीत जन्माला आलो म्हणून साजरा करा असे आवाहन खा.प्रितमताई मुंडे यांनी रॅलीच्या समारोप प्रसंगी केले. देशाने स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंचवीस आणि पन्नास वर्षे देखील बघितली होती,परंतु ती कुणी साजरी केली नाहीत. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मात्र पंचाहत्तर वर्षानिमित्त ‘अमृत महोत्सव’ साजरा करण्याचे आवाहन करून मोठा उत्सव साजरा करून स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या वीरांचे स्मरण करण्यासाठी अभियान राबविले आहे, हे अभियान आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरे केले जात असून देशाचा गौरव वाढत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
जलजीवन मिशन अभियानाचा जिल्हा परिषदेत आढावा
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना जलजीवन मिशन या योजनेचा आढावा खा.प्रितमताई मुंडे यांनी जिल्हा परिषदेत घेतला. जलजीवन मिशन योजनेचे काम करत असताना लोकांच्या तक्रारी, कामातील अडचणी आणि लोकप्रतिनिधींची भूमिका याबाबत आढावा घेऊन जलजीवनची कामे लवकरात लवकर आणि निःपक्षपातीपणे करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागांना दिल्या.
•••••