कडा / वार्ताहर
एकीकडे आदर्श ग्रामसेवक पुरस्काराचे मोठ्या दिमाखात वितरण होणार असतानाच, दुसरीकडे मात्र त्याच दिवशी एका गरीब व्यक्तीची अडवणूक करुन त्याच्याकडून लाच घेऊन या आनंदाच्या सोहळ्यावर विरजण टाकण्याचा कारनामा आष्टी तालुक्यातील एका ग्रामसेविकेने केला आहे.
याबाबत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, आष्टी तालुक्यातील पिंपळगाव घाट येथील तक्रारदार व्यक्तिंच्या वडीलांचे निधन झाले असून त्यांच्या नावावरील जागेचा उता-याची मागणी त्या गावाच्या ग्रामसेविका श्रीमती सोनाली अरविंद साखरे (रा.खर्डा ता. जामखेड जि. अ.नगर) हिने संबंधिताकडे तीन हजार रुपयाच्याची मागणी करुन ती रक्कम चांगदेव दळवी याच्याकडे देण्यास सांगितले. सदरील लाच स्विकारताना त्याला रंगेहात पकडण्यात आले आहे. याप्रकरणी ग्रामसेविका सोनाली साखरे व खाजगी व्यक्ति चांगदेव दळवी या दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपअधिक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्नाखाली पोलिस निरिक्षक अमोल धस, पोलिस अमंलदार भरत गारदे, अविनाश गवळी यांच्या पथकाने सदर कारवाई केली आहे. दरम्यान याच दिवशी बीड येथे आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या अवघे काही तास आधीच महिला ग्रामसेवकावर कारवाई झाल्यामुळे संपुर्ण कार्यक्रमात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईचीच जोरदार चर्चा होती.