मुंबई । दिनांक १८।
राज्य परिवहन महामंडळाची इंदोर-अंमळनेर बस मध्यप्रदेशातील धार येथे पुलावरून नदीत कोसळून दुर्घटनाग्रस्त झाल्याची घटना आज सकाळी घडली. या घटनेत महाराष्ट्रातील प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची बातमी कळाल्यावर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी संवेदना व्यक्त करत कोणाला काही मदत लागली तर मध्यप्रदेशातील भाजपच्या टीमशी किंवा आपणांस संपर्क साधावा असं आवाहन ट्विटद्वारे केलं आहे.
सध्या सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू आहे. राज्य परिवहन महामंडळाची इंदोर-अंमळनेर ही बस सकाळीच प्रवाशांना घेऊन निघाली. या बसमध्ये बहुतांश प्रवासी हे महाराष्ट्रातील होते. ही बस धार येथे पुलावरून नदीत कोसळली, यात चालक वाहकासह अनेक प्रवासी बुडून मरण पावले. घटना घडल्यानंतर भाजपचे मध्यप्रदेशातील प्रदेश मंत्री जयदीप पटेल यांनी फोन वरून ही माहिती पंकजाताई मुंडे यांना दिली. यासंदर्भात पंकजाताईंनी तेथील प्रशासनाशीही संपर्क साधला. या दुर्घटनेबद्दल ट्विट करत त्यांनी म्हटलं आहे की, “आज सकाळी दुःख होणार अशी बातमी आली. सकाळी जयदीप पटेल 9522233333 मंत्री प्रदेश भाजपा यांनी निरोप दिला एक बस पुणे येथून निघाली होती ती पुलावरून पडली आहे. संबंधित लोकांना कळवले, पण बातमी सुन्न करून गेली. कोणाला काही माहिती मदत हवी असल्यास MP च्या टीम शी बोलावे किंवा माझ्याशी संपर्क साधावा.”
••••















