Uncategorized

वसुलीसाठीच्या तगाद्याला कंटाळून महिलेची आत्महत्या; चौघांवर गुन्हा


अंबाजोगाई – उचलीचे पैसे परत दे म्हणून चौघांनी वसंतनगर तांडा (ता. परळी) येथील ऊसतोड कामगार महिलेच्या मागे तगादा लावला. तिला मारहाण आणि शिवीगाळ केली. अखेर सततच्या त्रासाला कंटाळलेल्या त्या महिलेने अंबाजोगाई येत विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. याप्रकरणी चौघांवर अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

संगीता ज्ञानोबा चव्हाण (वय ३२) असे त्या मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी विमलबाई भानुदास पवार यांच्या फिर्यादीनुसार, संगीताने उसतोडीच्या कामासाठी उचल घेतली होती. उचलीची रक्कम परत दे म्हणून प्रकाश रूपसिंग राठोड, भगवान रूपसिंग राठोड, रमेश रूपसिंग राठोड आणि विजयाबाई प्रकाश राठोड (सर्व रा. वसंतनगर तांडा) यांनी तिच्याकडे तगादा लावला होता. त्यासाठी आरोपींनी संगीताला बेदम मारहाण करून शिवीगाळ देखील केली. अखेर त्यांच्या सततच्या त्रासाला कंटाळलेल्या संगीताने रविवारी (दि.०३) अंबाजोगाईला येऊन गवळीपुरा भागातील एका रूग्णालयाजवळ तणनाशक विचारी औषध प्राशन केले. तिला अत्यवस्थ अवस्थेत अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे उपचार सुरु असताना संगीताचा बुधवारी (दि.०६) सायंकाळी मृत्यू झाला. सदर फिर्यादीवरून चारही आरोपींवर संगीताला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. गुन्हा दाखल होताच सर्व आरोपी फरार झाले असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पुढील तपास पीएसआय सुचिता शिंगाडे करत आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!