बीड, दि. 11 (लोकाशा न्यूज) : माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात सगळ्या गोष्ट झपाट्याने मार्गी लागत आहेत. एका बाजूने असे असले तरी दुसर्या बाजूने मात्र प्रत्येक जण माणूसकी हरवत चालल्याचे पहायला मिळत आहे. माणूसकीला काळीमा फासणारा असाच एक प्रकार बीडमध्ये घडला आहे. एका निर्दयी मातापित्यांनी आपल्या दोन अडीच वर्षांच्या बालकाला बीडच्या बसस्थानकात सोडून दिले. शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या पीएसआय मिना तुपे यांनी या बालकाला ताब्यात घेवून बालकल्याण समितीच्या स्वाधिन केले तर बालकल्याण समितीने त्या बालकाला आर्वीतील अनाथालयाच्या स्वाधिन केले आहे.
मागच्या दोन दिवसांपुर्वी बीड ग्रामीण ठाण्याच्या हद्दीतमध्ये एक मृत अर्भक आढळून आले होते, या अर्भकामुळे संपूर्ण जिल्हाभरात खळबळ उडाली होती, या प्रकरणाची चर्चा थांबतेय ना थांबतेय तेच बीडच्या बसस्थानकात एका दोन ते अडीच वर्षाच्या बालकाला सोडून त्याचे मातापिता फरार झाल्याचे समोर येत आहे. यासंदर्भात सोमवारी दुपारी दोन ते अडीचच्या सुमारास बीड बसस्थानकातील कर्मचार्यांनी शिवाजीनगर पोलिसांना माहिती दिली. या माहितीची तातडीने दखल घेवून पीएसआय मिना तुपे ह्या आपला फौजफाटा घेवून बीड बसस्थानकामध्ये दाखल झाल्या. त्यानंतर त्यांनी त्या बालकाला ताब्यात घेवून त्याची आरोग्य तपासणी केली त्यानंतर त्यास बीडच्या बाल कल्याण समितीच्या स्वाधिन करण्यात आले. तर बालकल्याण समितीने त्याला आर्वीतील अनाथालयात सोडले आहे. दरम्यान पीएसआय मिना तुपे यांच्यासह बीड पोलिस सदर बालकाच्या निर्दयी मातापितांचा शोध घेत आहेत.