Uncategorized

वारकर्‍यांनो, जवळच्या पोलीस ठाण्यातून टोलमाफीचा पास घ्या, बीड पोलिस अधिक्षकांचे आवाहन


बीड, दि. 8 (लोकाशा न्यूज) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेल्या वारकर्‍यांच्या वाहनांना टोलफ्रिचा निर्णय घेतलेला आहे, त्यानंतर आता बीड जिल्हा पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात टोलफ्रीचा पास उपलब्ध असल्याचे सांगत वारकर्‍यांनी संबंधित पासेस जवळच्या पोलीस ठाण्यातून घ्यावेत व या सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसांपुर्वी विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणार्‍या वारकर्‍यांच्या वाहनांना टोल लागणार नाही, पथकरातून सवलत दिली जाणार असल्याची घोषणा केली होती. तब्बल 48 तासानंतर प्रत्यक्ष वारकर्‍यांना आता पास मिळणार आहेत. बीड जिल्ह्यातून पंढरपूरसाठी जाणार्‍या वारकर्‍यांच्या वाहनांना टोलफ्रीचा पास आता वाहतूक शाखेसह जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात उपलब्ध असणार आहे. त्यामुळे ज्या वारकर्‍यांना वाहनांनी पंढरपूरकडे रवाना व्हायचे आहे त्यांनी आपल्या जवळच्या पोलीस ठाण्यामधून टोलफ्रीचा पास घ्यावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांनी केले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतलेल्या या निर्णयाचा बीड पोलिस प्रशासनामार्फत अनेक वारकर्‍यांना या पासचा लाभ मिळणार आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!