कडा :
तालुक्यातील खडखत येथे मुजाहीद पठाण या नावाच्या इसमाच्या पत्र्याच्या शेडमध्ये गोवंशीय प्राण्यांची कत्तल होत असल्याची गोपनीय माहिती बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यावरुन एलसीबी पथकाने घटनास्थळी टाकलेल्या छाप्यात 26 जिवंत जनावरे व दोनशे किलो गोमांस कातडीसह असा एकूण सात लाख ३७ हजारा रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करुन दोघांना ताब्यात घेतले तर एकजण फरार झाला आहे. आरोपीविरुध्द आष्टी पोलिसात महाराष्ट् गोहत्या बंदी कायद्यांतर्गत दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, बुधवार दि. ६ रोजी मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरिक्षक ज्ञानेश्वर कुकलारे, पोलीस उपनिरिक्षक तुपे, भगतसिंग दुलत यांच्या पथकाने प्राप्त खबरीनुसार आष्टी तालुक्यातील खडकत येथील मुजाहीद जब्बार पठाण याच्या पत्र्याच्या शेडमधुन गोवंशीय प्राण्याचे दोनशे किलो मांस अंदाजे किमत ३६,०००/- रुपये, सद्दाम अजीज कुरेशी याच्या गोडवानातून २१० नग प्राण्याची कातडी विक्री किमत २१,०००/- रुपये तसेच याठिकाणी जिवंत 26 गायी व एक वासरु सदर घटनास्थळी मिळून आली आहेत. असा एकूण सात लाख ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. दोन पंचासमक्ष जप्ती करुन आष्टी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. ताब्यात घेतलेल्या सर्व जिवंत जनावरांना शेकापूरच्या गोशाळेत सुरक्षित सोडण्यात आल्याचे पोलिस सुत्रांकडून सांगण्यात आले. विनापरवाना बेकायदेशीररित्या गोवंशीय प्राण्यांची कत्तल करुन चोरटी विक्री करण्यासाठी मांस साठवून तसेच जिवंत प्राण्यांना कत्तल करण्यासाठी जवळच्या शेडमध्ये डांबून ठेवल्याचे आढळून आल्याने पोलिस उपनिरिक्षक भगतसिंग दुलत यांच्या फिर्यादीवरुन मुजाहिद जब्बार पठाण(वय-45) अतीक मुनीर कुरेशी (वय-30) व फरार आरोपी सद्दाम अजीज कुरेशी सर्व (रा. खडकत ता.आष्टी) यांच्या विरोधात महाराष्टॄ गोहत्या बंदी कायदा कलम 5(b), 5(c),9(अ) सह कलम 429,34,भादवी प्रमाणे आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि सतिष वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरिक्षक ज्ञानेश्वर कुकलारे, उपनिरिक्षक तुपे, पोह गोले, ठोंबरे, शेख, जामदाडे, क्षिरसागर , बागवान, कदम, गायकवाड, कातखडे, शिंदे, दुबाले, पोशि चालक हराळ, कदम आदीनी कारवाईमध्ये सहभाग घेतला होता.
——–&&————–