परळी वैजनाथ ।दिनांक ०६।
नगरपरिषदेच्या भ्रष्ट आणि अनागोंदी कारभाराचे पितळ पहिल्याच पावसात अक्षरशः उघडे पडले. रस्ते व नाल्यांची कामे निकृष्ट झाल्याने अनेक भागातील घरा- घरांत आणि दुकानात पाणी शिरल्याने सर्वांची तारांबळ उडाली, या प्रकाराने नागरिकांत पालिकेच्या कारभाराविरुद्ध तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी आज वाॅर्डात ठिक ठिकाणी भेट देत आणि निकृष्ट कामाचे पंचनामे करत या असंतोषाला वाट मोकळी करून दिली. दरम्यान भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्याकडे नागरिक व कार्यकर्त्यांनी याविषयी तक्रारी केल्या. लवकरच या समस्या मार्गी लावू असा विश्वास त्यांनी दिला.
शहरात मध्यरात्री आलेल्या मुसळधार पावसाने नागरिकांची चांगलीच दाणादाण उडाली. मागील एक दोन पावसाने शहराच्या विविध भागातील नाल्या तुंबल्याने आतील सर्व घाण रस्त्यावर आली. अनेक भागातील घरात आणि दुकानात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले. पालिकेने केलेली रस्ते आणि नाल्यांची कामे अतिशय निकृष्ट झाल्याने हा सर्व त्रास जनतेला सहन करावा लागत असून वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे अशा तक्रारी नागरिकांनी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्याकडे केल्या होत्या.याच पार्श्वभूमीवर भाजपच्या वतीने आज अनोखे “पंचनामा आंदोलन” करण्यात आले.
कार्यकर्त्यांच्या ‘ऑन द स्पाॅट’ भेटी ; व्यापाऱ्यांनी मांडले गाऱ्हाणे
पंकजाताई मुंडे यांच्या संपर्क कार्यालयापासून भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोटार सायकल रॅली काढली. विविध भागात जाऊन झळ पोहोचलेल्या व्यापारी आणि नागरीकांशी संवाद साधला. रस्तेच नसल्याने हिंदनगर भागातील व्यापार ठप्प झाला असल्याचे व्यापार्यांनी सांगितले. तसेच टेलर लाईनला घाणीमुळे नागरीक आणि व्यापार्यांना अक्षरशः नाक दाबून जावे लागत आहे. सराफा लाईनला रस्ता खोदल्याने नीट चालता देखील येत नसल्याने विक्रीत घट झाल्याचे सांगितले. गणेशपार, हनुमान नगर, सावता माळी मंदिर भागातील नागरीकांनीही आपल्या समस्या मांडल्या तर महिलांनी अतिशय आक्रमकपणे भूमिका मांडली. आम्हाला रस्त्याने चालता येत नाही त्यामुळे मुलांना शाळेत सोडणे आणि घराबाहेर पडणे अवघड झाल्याचे सांगितले. यावेळी सर्वच भागातील नागरिकांनी पंचनामा आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला.
करोडो रुपयांचा निधी गेला कुठे?
दरम्यान, राज्यातून नुकतेच पायउतार झालेल्या महाविकास आघाडी सरकारमधील पालकमंत्री परळी पालिकेला करोडो रुपयांचा निधी आणल्याचा दावा करीत होते मग हा निधी गेला कुठे? असा सवाल भाजपने केला आहे. शहरातील भुयारी गटार योजनेसह एकही काम पुर्ण झाले नाही मग खर्च कुठे झाला. हा पैसा कुणाच्या खिशात गेला ? असा प्रश्न जनतेला पडला असल्याचे भाजपने म्हटले आहे. कार्यकर्त्यांनी शहराच्या विविध भागात जाऊन घाणीचे, अर्धवट कामामुळे झालेल्या चिखलाचे आणि भ्रष्ट कारभाराचे पंचनामे केल्यानंतर त्याचे सविस्तर निवेदन मुख्याधिकारी सुंदर बोंदर यांना भेटून दिले.
या आंदोलनात भाजपचे शहराध्यक्ष जुगलकिशोर लोहिया, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे, नगरसेवक प्रा. पवन मुंडे, ॲड. राजेश्वर देशमुख, उमेश खाडे, महादेव ईटके, प्रशांत कराड, योगेश पांडकर, अश्विन मोगरकर, नरसिंग सिरसाट, राजेंद्र ओझा, नितीन समसेट्टी, श्रीनिवास राऊत, राजेश कौलवार, धनराज कुरील, सुशिल हरंगुळे, सचिन गित्ते, मोहन जोशी, नरेश पिंपळे, कमलाकर हरेगावकर, अनिश अग्रवाल, किशोर केंद्रे, प्रल्हाद सुरवसे, आश्विन आघाव, दिलीप नेहरकर, गोविंद मोहेकर, चैतन्य मुंडे, गोपी कांगणे, विजय दहिवाळ, बाळु शहाणे, गोविंद चौरे, बाळु फुले, शेख अनिस, राहुल केंद्रे, अच्युत जोगदंड, बंडू कोरे, पवन तोडकरी, विजय बुंदेले, राम गिते, ज्ञानेश्वर मुंडे, वैजनाथ रेकने, शाम गडेकर, मिलींद कांबळे, वैजनाथ कांबळे,प्रदीप सुरवसे,वैजनाथ चाटे, ज्ञानेश्वर फड, माणिक गोरे, सय्यदभाई, सद्दामभाई, अमीरखान, शेरखान आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
••••