मुंबई, विधानपरिषदेचा निकाल लागल्यापासून महाविकास आघाडीत खदखद बाहेर येत आहे. फडणवीसांनी पाचही जागा निवडून आणल्याने राज्यात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे.
भाजपला राज्यसभेवेळी १२३ मतं पडली होती. यंदा १३३ मतं पडल्याने मविआ सरकारची आणखी १० मतं फोडण्यात फडणवीसांना यश आलं आहे. मात्र सेनेची ११ मतं फुटल्याने शिवसेनेच्या गोटात खळबळ आहे. यासोबतच महाविकास आघाडीतील काँग्रेसचा उमेदवार पराभूत झाल्याने ‘ब्लेमगेम’ला सुरुवात झाली आहे. नाराजीनाट्य वाढल्याने काँग्रेसमधील उमेदवारांनी देखील क्रॉसवोटिंग केल्याचं स्पष्ट झालं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काँग्रेसच्या आमदारांनी पक्षाचा आदेश धुडकावल्याने आता जबाबदारी बाळासाहेब थोरात यांच्यावर आली आहे. यामुळे काँग्रेसच्या गटनेता पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे.
यंदा विधानपरिषदेसाठी काँग्रेसने दोन उमेदवार दिले होते. यामध्ये भाई जगताप आणि भाजपचे प्रसाद लाड यांच्यात महत्वाची लढत होती. चंद्रकांत हंडोरे हे काँग्रेसचे पहिल्या पसंतीचे उमेदवार होते. मात्र, पहिल्या पसंतीच्या उमेदवाराचा पराभव झाला. आणि भाई जगताप यांना लॉटरी लागली. दहाव्या जागेसाठी भाई जगताप यांचा विजय होणार की प्रसाद लाड विधानपरिषदेवर जाणार, अशी चर्चा होती. परंतू, काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात क्रॉसवोटिंग झालं.
राज्यसभेच्या निवडणुकीवेळी भाजपला १२३ मतं मिळाली. मात्र यंदा विधानपरिषदेसाठी १३३ मतं मिळवत भाजपने मोठ्या प्रमाणात आमदार फोडले.