Uncategorized

चुकीची कामे खपवून घेणार नाही, पहिल्याच बैठकीत तंबी देत एसपींनी तक्रारदारांना न्याय देण्यासाठी ठाणेदारांना दिले कानमंत्र


बीड, दि. 18 (लोकाशा न्यूज) : बीड पोलिस अधीक्षक पदाचा पदभार स्विकारल्यानंतर शनिवारी एसपी नंदकुमार ठाकूर यांनी बीड जिल्ह्यातील गुन्ह्यांसंदर्भात आढावा बैठक घेतली. सकाळी साडे दहा वाजता सुरू झालेली ही बैठक दुपारी आडीच वाजता संपली. चुकीची कामे खपवून घेणार नाही, अशा शब्दात तंबी देत ठाकूर यांनी तक्रारदारांना न्याय देण्यासाठी ठाणेदारांना कानमंत्री दिले आहेत.
या बैठकीला सहाय्यक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत, रश्मिता राव, अंबाजोगाईच्या अप्पर पोलिस अधीक्षक कविता नेरकर, डीवायएसपी संतोष वाळके, स्वप्निल राठोड, अभिजित धाराधिवकर, जायभाये, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सतिश वाघ, बीड शहर ठाण्याचे पोलिस निरीक्षक रवि सानप, शिवाजीनगरचे केतन राठोड, ग्रामीणचे संतोष साबळे, पेठ बीडचे पालवे, पिंपळनेरचे आघाव, सुरेखा धस, हरिभाऊ राठोड, वाहतूक शाखेचे भारती यांच्यासह इतर अधिकार्‍यांची उपस्थिती होती. या बैठकीत एसपींनी बीड जिल्ह्यातील संपूर्ण गुन्ह्यांचा पोलिस ठाण्यानिहाय आढावा घेतला. चुकीची कामे खपवून घेणार नाही तर चांगल्या कामांचा त्या त्यावेळी सन्मानच केला जाईल, त्यामुळे तक्रार घेवून आलेल्या नागरिकांना चांगली वागणूक द्या, प्रत्येकाचे समाधान होईल असेच काम करा, असे आदेश एसपींनी यावेळी सोडले.

दामिनी पथक पुन्हा अ‍ॅक्टीव होणार
महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी बीड पोलिस प्रशासनाने आधी चिडीमार त्यानंतर दामिनी पथकाची स्थापना केली होती, सुरूवातीच्या काळात या पथकांनी गतीने काम करून जिल्ह्यातील महिला आणि मुलींना सुरक्षा दिली, मागच्या काही दिवसांपासून मात्र या पथकाची गती मंदावल्याचे पहायला मिळत आहे. अगदी हेच लक्षात घेवून दामिनी पथक पुन्हा महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी अ‍ॅक्टीव करा, अशा स्पष्ट सुचना या बैठकीत एसपींनी ठाणेदारांना दिल्या आहेत.

‘त्या’ गंभीर गुन्ह्यांचा तपास
लावणार्‍या पोलिसांचा केला सन्मान
चांगल्या पध्दतीने आणि गतीने गुन्ह्यांचा तपास लावल्यामुळे या बैठकीत एसपींनी पोलिस अधीकारी आणि कर्मचार्‍यांना सन्मानपत्र देवून त्यांचा सन्मान केला. या सन्मानात बीड एलसीबी, परळी पोलिसांसह अन्य पोलिस अधीकारी आणि कर्मचार्‍यांचा समावेश आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!