बीड, दि. 26 (लोकाशा न्यूज) : शिरूर तालुक्यातील आनंदगाव येथे सहा मे रोजी घडलेल्या खुनाच्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला होता. अवघ्या वीस दिवसात या घटनेचा पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक सुनिल लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सतिष वाघ आणि त्यांच्या पथकाने छडा लावला आहे. स्वत:पासून विभक्त झालेली पत्नी आणि तिच्या भावांपासून सुरू असलेल्या त्रासावर तोडगा काढण्यासाठी विशेष म्हणजे त्या मेव्हूण्यांना कायमची अद्दल घडविण्यासाठी आरोपीने आनंदगावमधील ‘त्या’ निष्पाप शेतकर्याचा जीव घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. सदर आरोपीला एलसीबीने वर्धा जिल्ह्यातून बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेविषयी गुरूवारी पत्रकार परिषद घेवून पोलिस अधीक्षकांनी सर्व घटनाक्रम सांगितला आहे. अशा घटनांची प्रेरणा कोणीही घेवू नये, असे आवाहनही यावेळी एसपींनी केले आहे. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक सुनिल लांजेवार, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सतिष वाघ यांचीही उपस्थिती होती.
सरकल्या उर्फ भगवान पुस्तक्या चव्हाण (रा.तागडगांव शिवार ता.शिरुर कासार) असे आनंदगावच्या शेतकर्याचा खुन करणार्या आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, की शिरुर ठाण्याच्या हद्दीमधील आनंदगांव शिवारात 6 मे रोजीच्या मध्यरात्री कुंडलीक सुखदेव विघ्ने (वय 65 वर्षे रा. आनंदगांव ता.शिरुर कासार) हे त्याच्या शेतातील जनवारांच्या राखणीसाठी झोपलेले होते, यावेळी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरुन त्यांच्या छातीमध्ये धारधार शस्त्राने मारुन खुन केला होता. यापुर्वी 5 मे रोजीच्या मध्यरात्री खांबा लिंबा गावाच्या शिवारात नारायण गणपती सोनवणे (वय 65 वर्षे रा.खांबा लिंबा ता.शिरुर कासार) हे त्यांच्या राहत्या घरासमोर झोपलेले असताना झोपेतच त्यांना कोणी तरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरुन जिवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या चेहर्यावर धारधार शस्त्राने वार करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. या दोन्ही घटनेच्या ठिकाणी दोन-दोन चिठ्ठ्या मिळून आल्या होत्या. त्यामध्ये आरोपीने पोलीसांची दिशाभूल करण्यासाठी दुसर्याच इसमांचे नावे टाकून त्यांना अटक न केल्यास खुनाचे सत्र पुढे असेच चालू राहील, असे पोलीसांना आव्हान करुन तपासाची दिशा भरकटविण्याचा प्रयत्न केला होता. परंतू दोन्ही चिठ्ठ्यांवरून दोन्हीही गुन्हे एकाच आरोपीने केल्याची खात्री झाली होती. सदर दोन्ही घटनेच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक सुनिल लांजेवार यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तात्काळ दोन्ही गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. त्यावरुन गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सतीष वाघ यांनी दोन वेगवेगळे पथके तयार करुन जिल्ह्यातील व लगतच्या जिल्ह्यातील वेगवेगळया गुन्हेगार वस्त्या चेक करीत असतांना गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की, आनंदगांव शिवारातील केलेल्या इसमाचा खुन हा सरकल्या उर्फ भगवान पुस्तक्या चव्हाण (रा.तागडगांव शिवार ता.शिरुर कासार) याने केला असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली, त्यावरून गुन्हे शाखेची दोन पथके त्याच्या मागावर असतांना तो बीडकीन (ता.पैठण जि.औरंगाबाद) भागात गेल्याची माहिती मिळाल्याने त्याचा बीडकीन भागात शोध घेतला. परंतू तेथूनही तो पसार होवून वर्धा जिल्ह्यात पुजाई गावात त्याच्या बहिणीकडे गेल्याची माहिती मिळाली, त्यानंतर गुन्हे शाखेची दोन्हीही पथके सदर ठिकाणी पुजाई गावाच्या शिवारात शोध घेत असतांना त्याला पोलीसांची चाहूल लागल्याने तो पळून जाण्याचा प्रयत्न करीत असतांना सरकल्या उर्फ भगवान पुस्तक्या चव्हाण यास एक ते दीड किलोमिटर पाठलाग करुन ताब्यात घेतले. त्यास विश्वासात घेवून त्याच्याकडे सदर गुन्ह्यांबाबत विचारपुस केला असता त्याने सदरचे दोन्हीही गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. आरोपीची पत्नी त्याच्यापासून विभक्त झालेली आहे, यावरूनच पत्नीचे भाऊ आरोपीला मारहाणही करत होते, परिणामी मारहाण करणार्या मेव्हूण्यांना अडकविण्यासाठी आरोपींने सदर खुनाचा गुन्हा केला असल्याची माहिती गुरूवारी सायंकाळी येथील पोलिस अधीक्षक कार्यालयात पत्रकार परिषद घेवून पोलिस अधीक्षकांनी दिली आहे. त्यास शिरूर पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या गु.र.नं. 50/2022 कलम 302 भादंविमध्ये अटक करुन पुढील तपास पो.नि. पो.स्टे.शिरुर हे करीत आहेत. सदर आरोपीचे साथीदार कोण आहेत ? गुन्हयात कोणत्या हत्याराचा वापर केला ? अशा विविध बाबींचा तपास सुरु आहे. सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक सुनिल लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतिष वाघ, सपोनी कुकलारे, दुल्लत, तांदळे, वाघ, पोना कदम, गायकवाड, हांगे, कातखडे, शिंदे, पोलिस शिपाई शेख, सुरवसे यांनी केली.
25 संशयितांची केली चौकशी
आनंदगावमधील खून प्रकरणात पोलिसांनी 25 संशयितांना ताब्यात घेवून चौकशी केली होती, मात्र यापैकी एकाचाही या गुन्ह्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध आढळून आला नाही.
खांबालिंब्यातील ‘त्या’ वृध्दाचाही
आरोपीला घ्यायचा होता जीव
5 मे च्या मध्यरात्री खांबा लिंबा गावाच्या शिवारात नारायण गणपती सोनवणे हे त्यांच्या राहत्या घरासमोर झोपलेले होते, यावेळी झोपेतच त्यांच्या चेहर्यावर आरोपींने धारधार शस्त्राने वार केले, सोनवणे मयत झाले असे आरोपीला वाटले, याअनुषंगानेच त्यांच्यावर वार करण्यात आले होते, मात्र सुदैवाने सोनवणे यातून बचावले आहेत.
धारूर आणि अंबाजोगाईच्या गुन्ह्यांचाही
लवकरच तपास लागणार
धारूर आणि अंबाजोगाई ग्रामीण ठाण्याच्या हद्दीत खूनाच्या घटना घडलेल्या आहेत. या दोन्ही घटनांचाही लवकरच छडा लावू असा विश्वास यावेळी पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी बोलून दाखविला आहे.