Uncategorized

मराठवाड्यातही आवरगावचाच डंका, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्राम स्वच्छतेचा विभागातील प्रथम पुरस्कार पटकावला, पाच लाख मिळणार


बीड, दि.9 (लोकाशा न्यूज) : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन 2019-20 अंतर्गत विभागस्तरीय तपासणी समितीद्वारे ग्रामपंचायतींची तपासणी करण्यात आली होती, विभागस्तरीय तपासणी समितीने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे पारितोषिक पात्र ग्रामपंचायतींचा निकाल जाहिर करून तो राज्यस्तरीय तपासणी समितीस कळविण्यात आला आहे. यामध्ये धारूर तालुक्यातील आवरगावने विभागातील प्रथम पुरस्कार पटकविला आहे. यापुर्वी आवरगाव स्मार्ट ग्राममध्ये आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्राम स्वच्छतेमध्ये जिल्ह्यात प्रथम आले होते, या गावाला पुढे घेवून जाण्यासाठी जिल्हा परिषदेचे सीईओ अजित पवार हे मोलाची भुमिका बजावत आहेत.
धारूर तालुक्यातील आवरगावने जिल्ह्यात एक वेगळी छाप निर्माण केली आहे. सुरूवातीला या गावाने स्मार्ट ग्राम स्पर्धेत तालुकास्तराबरोबरच जिल्हास्तरावरील स्पर्धेत यश मिळविले. अगदी याच स्पर्धेतील उर्जा कायम ठेवून गावकर्‍यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्राम स्वच्छतेच्या स्पर्धेसाठी काम केले. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेचे सीईओ अजित पवार आणि त्यांच्या संपूर्ण टिमने या गावात लक्ष केंद्रीत करून ज्या ज्यावेळी ज्या ज्या गोष्टींची, कामांचा आवश्यकता आहे त्या त्या गोष्टी आवरगावात पुरविल्या. याच गावात सरपंचांची परिषद घेवून जिल्ह्यातील सरपंचांना उर्जा देण्याचे काम पवारांनी केले, यादरम्यानच आवरगाव स्वच्छतेच्या स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम आले आणि पुढे हे गाव विभागीय स्पर्धेत निवडण्यात आले. त्यानुसार विभागीय पथकाने गावात येवून गावाची प्रत्यक्ष पाहणी केली. विभागीय स्पर्धेचा निकाल बुधवारी जाहिर करण्यात आला. त्यानुसार या स्पर्धेचे विभागातले पहिले पारितोषीक आवरगाव आणि हिंगोली जिल्ह्यातील दाटेगावला जाहिर करण्यात आले आहे. या दोन्ही गावांना पाच-पाच लाख रूपये मिळणार आहेत. तसेच द्वितीय पुरस्कार (विभागून) वांगी बु, ता.भूम, जि.उस्मानाबाद व अलगरवाडी ता.चाकूर, जि.लातूर, तृतीय पुरस्कार (विभागून) उटी बु., ता.औसा, जि.लातूर व गौर, ता.पुर्णा, जि.परभणी, विशेष पुरस्कार-सांडपाणी व्यवस्थापन बोल्डावाडी, ता.कळमनूरी, जि.हिंगोली, विशेष पुरस्कार-पाणी गुणवत्ता व पाणी व्यवस्थापन खेड, ता.जि.उस्मानाबाद आणि विशेष पुरस्कार-शौचालय व्यवस्थापन हस्ता, ता.कन्नड, जि.औरंगाबाद या ग्रामपंचायतींना जाहिर करण्यात आला आहे. गावकर्‍यांची एकी आणि नेकी आवरगावकरांना प्रत्येक स्पर्धेत यश मिळवून देत आहे. हा पुरस्कार गावाला मिळवून देण्यासाठी सीईओ अजित पवार आणि त्यांच्या संपूर्ण टिमने महत्वाची जबाबदारी बजावलेली आहे. त्यामुळे त्यांचे गावच्या सरपंच पद्मीनीबाई जगताप, युवा नेते अमोल जगताप, ग्रामसेवक बाळासाहेब झोंबाडे आणि ग्रामस्थांनी आभार मानले आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!