बीड (प्रतिनिधी):- वारंवार प्रयत्न करून देखिल बीड शहरवासियांचा पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याने आ.संदीप क्षीरसागर यांनी पाणी पुरवठा विभागाचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्याकडे पाठपुरावा करून रविवार दि.1 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालय,बीड या ठिकाणी पाणी पुरवठा योजनेची आढावा बैठक पार पडली असून येत्या आठ ते दहा दिवसांमध्ये योग्य ते नियोजन करून शहराला नियमितपणे पाणी पुरवठा झालाच पाहिजे असे कडक निर्देश यावेळी बैठकीचे अध्यक्ष राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी प्रशासनाला दिले आहेत.
बीड शहरात अमृत योजने अंतर्गत पाणी पुरवठा योजनेचे काम मंजुर असून तांत्रिक बाबींमुळे यात अडथळा आला आहे. यामुळे मात्र शहरवासियांचे अतोनात हाल होत आहेत. कडक उन्हाळ्यात पाणी साठा उपलब्ध असूनही पाण्याविना हाल सहन करावे लागत आहे. शहरातील काही भागांमध्ये पंधरा तर काही भागांमध्ये 20 दिवसातून एकदा पाणी मिळत आहे. यामुळे सर्वात महत्त्वाचा प्रश्न उभा राहिला आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आ.क्षीरसागर यांनी वेळोवेळी संबंधितांकडे पाठपुरावा केला आहे. परंतू यामध्ये सतत अडथळा येत असून नागरिकांचे हाल होत असल्याने आज रविवार 1 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालय,बीड येथे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली या योजनेच्या उर्वरित कामांविषयी आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये, किरकोळ अशा जोडाजोडींच्या कामांमुळे शहराला पाणी पुरवठा होत नसल्याचे समोर आले. संबंधित कंत्राटदाराच्या दिरंगाईने हे सर्व होत असल्याने त्याला 10 दिवसांची मुदत देत काम पुर्ण करण्यात यावे अन्यथा कारवाई केली जाईल असे निर्देश राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या सूचनेनुसार जिल्हाधिकार्यांनी संबंधित अधिकार्यांना दिले. बीड शहराला जोपर्यंत सुरळीत पाणी पुरवठा होणार नाही तोपर्यंत मी अखंडित पाठपुरावा करतच राहिल असे आ.संदीप क्षीरसागर यांनी यावेळी सांगितले. या बैठकीस पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे राज्यंमत्री संजय बनसोडे, आ.संदीप क्षीरसागर यांच्यासह जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, उपजिल्हाधिकारी तथा न.प.चे प्रशासक नामदेव टिळेकर, नगर परिषदेचे मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत, राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, माजी आ.सुनिल धांडे, माजी आ.सय्यद सलीम व संबंधित विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.