धारूर, दि. 26 (लोकाशा न्यूज़) : धारुर येथील आडत व्यापारी मारुतीराव गायके हे गंभीर जखमी, हातपाय बांधलेल्या व बेशुद्ध अवस्थेत आढळून आले असून त्यांना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अशा घटनेने धारूर परिसरातील व्यापारी भयभीत झाले आहेत, तरी हल्लेखोरांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी धारूरच्या व्यापारी वर्गातून होत आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, दि. 25 सोमवारी रात्री आडत व्यापारी मारुतीराव गायके हे खाजगी कामानिमित्त केज येथे गेले होते. मात्र रात्री उशिरापर्यंत परत आले नसल्याने नातलगांनी पोलिसांना संपर्क केला पोलिसांनी रात्री एकच्या सुमारास केज रस्त्यावर शोध घेतला असता कासारी पाटीजवळ मारुती गायके यांची दुचाकी पडलेली दिसली पुढे शोधाशोध केला असता काही अंतरावर हातपाय बांधलेल्या व गंभीर जखमी व बेशुद्ध अवस्थेत ते आढळून आले, मारुती गायके यांच्या पाठीवर व मांडीवर अज्ञात धारदार शस्त्राने वार करण्यात आलेले आहेत. त्यांना तात्काळ धारुर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. यानंतर पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर घटनेमुळे धारुर शहरात खळबळ उडाली असून व्यापार्याला चोरीच्या उद्देशाने जबर मारहाण झाल्याची चर्चा आहे. याबाबत सहाय्यक पोलिस निरिक्षक व्हि.एस. आटोळे यांच्याशी संपर्क केला असता सदर व्यक्ती घरी परत आला नसल्याची माहिती मिळाल्यामुळे तिचा पोलिसांनी शोध घेतला. यावेळी केज रस्त्यावर कासारी पाटीजवळ ते बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. अद्यापही ते बेशुद्ध अवस्थेत असून तपास सुरु असल्याची माहिती दिली. याबाबत रात्री उशीरापर्यंत गुन्हा नोंद झाला नव्हता. सकाळीच पोलिस अंबाजोगाई रुग्णालयाकडे पुढील तपासासाठी गेले होते.















