Uncategorized

बीडमध्ये सलोखा आहे, सामाजातील शांतता
आम्ही भंग होवू देणार नाही : एसपी सुनिल लांजेवार


बीड, दि. 22 (लोकाशा न्यूज) : बीडमध्ये सलोखा आहे, इथं भोंग्याचं राजकारण खपवून घेणार नाही, अशा प्रकारामुळे समाजातील शांतता भंग होवू देणार नाही, यासाठी बीड पोलिस प्रशासन कटिबध्द असल्याचे जिल्ह्याचे प्रभारी पोलिस अधीक्षक सुनिल लांजेवार यांनी म्हटले आहे.
बीड जिल्हा पोलिस दलाचे प्रभारी पोलिस अधीक्षक सुनिल लांजेवार यांनी शुक्रवारी सायंकाळी बीडमधील एका रोजा इफ्तारला उपस्थिती लावली. यावेळी ते माध्यमांशी बोलताना म्हटले, की सध्या मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिणा सुरू आहे. याअनुषंगाने मुस्लिम बांधव दिवसभर रोजा ठेवतात आणि रात्री तो सोडतात, विशेष म्हणजे मागच्या अनेक वर्षांपासून बीडमध्ये हिंदु आणि मुस्लिम बांधव एकत्र येवून हा रोजा इफ्तार साजरा करत आहेत.  यामध्ये समाजातील सर्व घटक सहभागी होतात. हा एक आदर्श उपक्रम आहे, त्यामुळेच मी आज याठिकाणी आलो, सर्व जण आज बीडमध्ये अशा प्रकारे गुण्यागोविंदाने राहत आहेत, असे असतानाही सध्या काही समाज कंटक वातावरण दुषित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मग भोंग्यावरून पेटलेलं राजकारण असो की अन्य काही, अशा प्रकारचा कुठलाही प्रकार आम्ही खपवून घेणार नाही, समाजातील शांतता भंग होवू देणार नाही, यासाठी आमचं पोलिस प्रशासन कटिबध्द असल्याचे यावेळी लांजेवार म्हणाले.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!