
बीड, दि. 18 (लोकाशा न्यूज) : पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलजीवन मिशन हाती घेतलेले आहे. या योजनेमुळे प्रत्येकाच्या घरात नळाव्दारे पाणी येणार आहे. त्यांनी हाती घेतलेले हेच काम आता जिल्ह्याच्या खा. प्रीतमताई मुंडे यांनीही आपल्या अजेंड्यावर घेतले आहे. घराघरात पाणी पोहचविण्यासाठी खा. मुंडेंनी या योजनेमध्ये बारकाईने लक्ष घातले आहे. याअनुषंगानेच सोमवारी त्यांनी येथील जिल्हा परिषदेच्या कार्यालयात येवून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार आणि पाणी पुरवठा विभागाच्या अधिकार्यांसोबत बैठक घेतली. या योजनेत पक्षपात न करता प्रत्येक काम अत्यंत प्रभावीपणे आणि गतीने करा, यासाठी लागणारा निधी कमी पडू देणार नाही, असा विश्वास यावेळी खा. मुंडेंनी बोलून दाखविला आहे. त्यामुळे या योजनेला बीड जिल्ह्यात आता प्रचंड प्रमाणात गती मिळणार आहे.
पिण्याच्या पाण्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना नेहमीच कोणत्यान कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते, यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कायमचा तोडगा काढला आहे. त्यांनी हाती घेतलेली जलजीवन मिशन बीडसह संपूर्ण देशभरात जलक्रांती आणणार आहे. जिल्ह्यासाठी जलक्रांती ठरणार्या या योजनेला बीडमध्ये सीईओ अजित पवार यांनी अगदी पहिल्यापासूनच गती दिलेली आहे. मात्र आणखी या कामांना कशा प्रकारे गती मिळेल आणि ही कामे चिरकाळ कशा प्रकारे टिकून राहतील यासर्व गोष्टी लक्षात घेवून काल खा. प्रीतमताईंनी जिल्ह्यातील सर्व कामांचा आढावा घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी काल झेडपीत सीईओ अजित पवार, कार्यकारी अभियंता उबाळे यांच्यासोबत तासभर बैठक घेतली, या बैठकीत खा. मुंडेंनी अधिकार्यांचे अनेक मुद्द्याकडे लक्ष वेधून त्यांना सुचना केल्या. जलजीवन मिशन बीड जिल्ह्यासाठी क्रांतीकारी योजना ठरणार आहे. त्यामुळे कुठलाही पक्षपात न करता ही योजना जिल्ह्यात प्रभावीपणे राबवा, निधीबद्दल कुठलीही अडचण येणार नाही, म्हणजे थोडाही निधी कमी पडू देणार नसल्याचे यावेळी खा. मुंडेंनी बोलून दाखविले. याच विषयावर काल खा. मुंडेंसह केंद्रीय आणि राज्यातील अधिकार्यांनीही सीईओंसोबत बैठका घेतल्या. या दोन्ही बैठकांमध्ये महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामुळे मे एण्डपर्यंत या योजनेचा शंभर टक्के डीपीआर तयार केला जाणार असून जुनमध्ये प्रत्यक्ष कामाला सुरूवात होणार आहे. विशेष म्हणजे ज्या गावात यापुर्वी नळ योजना नाही, अशा गावांमध्ये ही योजना प्राधान्याने राबवा, अशाही सुचना यावेळी खा. मुंडेंनी केलेल्या आहेत. सध्या या योजनेतून 89 गावांना वर्कऑर्डर दिलेल्या आहेत. यापैकी ऐंशी गावात कामे चालू आहेत, 257 गावातील कामांना प्रशासकिय मान्यता दिलेली आहे. 197 गावातील कामांचे टेंडर प्रकाशित झालेले आहेत. 485 गावांचे डीपीआर पुर्ण झालेले आहेत. तर 1367 पैकी 835 गावांतील सर्वे पुर्ण झालेला असून या योजनेवर तब्बल 744 कोटी रूपये खर्च केले जाणार आहेत. दरम्यान अधिकारी आणि कर्मचार्यांची कमतरता असतानाही पाणी पुरवठ्याचे कार्यकारी अभियंता श्री. उबाळे हे या योजनेचा गाडा प्रभावीपणे हाकत आहेत. यासाठी त्यांना सीईओ अजित पवार यांचे पावलोपावली मार्गदर्शन मिळत आहे. तर आता यासाठी खा. मुंडेही जिल्हा परिषदेचे सीईओ आणि पाणीपुरवठ्यातील अधिकार्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या आहेत.
खा. मुंडेंचे झेडपीत झाले
मोठ्या उत्साहात स्वागत
राज्याच्या ग्रामविकास पदावरून काम करताना पंकजाताईंनी जिल्ह्यात तब्बल 25 हजार कोटींहून अधिक निधी खेचून आणला. याच निधीमध्ये बीड जिल्हा परिषदेची टोलेजंग इमारत उभी राहिली, पंकजाताईंनी बांधलेल्या या टोलेजंग ईमारतीत काल खा. मुंडेंनी जलजीवन मिशनच्या कामासंदर्भात बैठक घेतली. या बैठकीपुर्वी झेडपीत खा. मुंडेंचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, संतोष हंगे, अशोक लोढा, शहराध्यक्ष भगिरथ बियाणी, विक्रांत हजारी, मुन्ना फड, सुनिल मिसाळ, लक्ष्मण जाधव, अॅड संगिता धसे, संतोष राख यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
मंजूर झालेल्या सुरत-नगर-चेन्नई महामार्गाकडेही
खा. मुंडेंनी वेधले अधिकार्यांसह जिल्ह्याचे लक्ष
केंद्र सरकारच्या भारतमाला परीयोजनेतून मंजूर झालेल्या सुरत-अहमदनगर-चेन्नई या राष्ट्रीय महामार्गासंदर्भात सोमवारी बीड जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत रस्त्याविषयी खा. प्रीतमताई मुंडे यांनी संबंधित विभागांना सुचना दिल्या,आष्टीचे आ.बाळासाहेब आजबे हे देखील बैठकीला उपस्थित होते. जिल्ह्यातून जाणारा हा महामार्ग जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यांना जोडला जावा, आवश्यकतेनुसार सर्व्हिस रोडची पूर्तता करण्यात यावी तसेच जिल्ह्यातील रेल्वे स्थानकांशी हा मार्ग संलग्न करावा अशा सूचना यावेळी खा. मुंडेंनी संबंधित अधिकार्यांना दिल्या.















