अंबाजोगाई – मतदार संघातील विकासाचे मुद्दे आणि प्रश्नांवर विधानसभेत आक्रमक असणाऱ्या आमदार नमिता मुंदडा या मतदारसंघात कर्तव्यदक्षपणा आणि साधेपणासाठी विशेष प्रसिद्ध आहेत. रविवारी (दि.१७) त्यांच्यातील साधेपणाची पुन्हा एकदा प्रचीती आली. अंबाजोगाई तालुक्यातील वरपगाव येथील अखंड हरिनाम सप्ताहात सक्रिय सहभाग घेत आ. मुंदडा यांनी ग्रामस्थ महिलांसोबत बसून चक्क महाप्रसादासाठीच्या पोळ्या लाटल्या. यावेळी आमदारांच्या साधेपणामुळे उपस्थित महिलांच्या चेहऱ्यावर कौतुकमिश्रित आश्चर्याचे हावभाव उमटले होते.
आ. नमिता मुंदडा यांचा जन्म मुंबईसारख्या महानगरात झालेला. मुंबईत महाविद्यालयीन शिक्षणफ्रान्सच्या विद्यापीठातून वास्तूविशारद पदवी प्राप्त केलेल्या आ. मुंदडा आ. नमिता मुंदडा यांचा अक्षय मुंदडा यांच्याशी विवाह झाल्यानंतरच ग्रामीण भागाशी संपर्क आला. मात्र, सासरे तथा ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पती अक्षय मुंदडा यांच्या साथीने अल्पावधीतच त्यांची अंबाजोगाई, केज, बीड या कार्यक्षेत्रातील शहरांसह तालुक्यातील ग्रामीण भागाशी त्यांची नाळ जुळली. स्वतः आमदार असताना पदाचा बडेजाव न करता त्या थेट सामान्य लोकात मिसळतात. वृद्ध, महिलांशी संवाद साधतात, आपुलकीने चौकशी करतात. अतिवृष्टीच्या काळात प्रशासनालाही नुकसानीचा अंदाज येण्यापूर्वी आ. मुंदडा यांनी पहाटेच मतदारसंघात भेटी देऊन नागरिकांना धीर देण्याचे काम केले. मतदारसंघातील सार्वजनिक, शासकीय कामाचे भूमिपूजन असो, इमारतीचे उद्घाटन, गावागावातील अखंड हरिनाम सप्ताह असो की सामान्य कार्यकर्त्यांच्या घरातील लहानमोठे कार्यक्रम असो, आ. मुंदडा यांना निमंत्रण दिले आणि त्या आल्या ना गत असे सहसा होत नाही. मतदारसंघातील जास्तीतजास्त कार्यक्रमास उपस्थिती दर्शवत सक्रीय सहभाग घेण्याचा या स्व. डॉ. विमलताई मुंदडा यांचा पायंडा त्यांच्या सुनबाई नमिता यांनी जाणीवपूर्वक जोपासला आहे. मात्र, मतदारसंघात सालस भासणाऱ्या आ. मुंदडा विधानसभेत विकासाचे मुद्दे आणि प्रश्नांवर तेवढ्याच आक्रमक होतात हे संपूर्ण राज्याने पाहिले आहे. राज्यातील सर्वात कार्यतत्पर तरुण आमदारात आ. मुंदडा यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. या सर्व गुणांमुळे आ. मुंदडा यांची मतदारसंघात क्रेझ आहे. स्व. आ. डॉ. विमलताई मुंदडा यांच्याप्रमाणेच मतदारसंघातील सर्वांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण होत आहेत.
वरपगाव येथे १० ते १६ एप्रिल दरम्यान अखंड हरीनाम सप्ताह तुकाराम गाथा पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. रविवारी पांडुरंग महाराज कोकाटे यांचे काल्याचे कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्याठिकाणी भाविकांसाठी स्वयंपाक बनवत असलेल्या ग्रामस्थ महिलांनी आ. मुंदडा यांना पोळ्या लाटण्याचा आग्रह धरला. आ. मुंदडा यांनी देखील कसलेही आढेवेढे न घेता तत्काळ पोळ्या लाटत बसलेल्या महिलांच्या सोबतील बसून चक्क पोळ्या लाटण्यास सुरुवात केली. आ. नमिता मुंदडा यांचा हा सक्रिय सहभाग पाहता स्वयपाकगृहात उपस्थित असलेल्या महिलांच्या चेहऱ्यावर उमटलेले कौतुक आणि आश्चर्याचे भाव पाहण्यासारखे होते. अनेक ग्रामस्थांनी हा क्षण आपापल्या मोबाईलमध्ये कैद केला. दरम्यान, वरपगावचे सरपंच अंकुश शिंदे, उपसरपंच दत्तात्रय वीर आणि ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन अखंड हरीनाम साप्ताह यशस्वीपणे पार पाडला.















