Uncategorized

श्रीक्षेत्र हनुमान गडाच्या महंतांकडून पंकजाताई मुंडेंचे फुलांच्या वर्षावाने स्वागत ; रथातून मिरवणूकही,भक्तांच्या अलोट गर्दीत पार पडला अखंड हरिनाम सप्ताहाचा सांगता सोहळा,माझ्या जीवनातील प्रत्येक क्षण कष्टकऱ्यांच्या सेवेसाठी – पंकजाताई

बीड ।दिनांक ११।
श्री क्षेत्र हनुमानगड (ता. पाटोदा) संस्थानच्या वतीने आयोजित अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञान यज्ञ सोहळ्याची सांगता आज भाविक भक्तांच्या अलोट गर्दीत मोठया उत्साहात झाली. सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांची गडाच्या महंतांनी वाजत-गाजत मिरवणूक काढून फुलांच्या वर्षावात जोरदार स्वागत केले.

श्रीक्षेत्र हनुमानगडाचा परिसर हा लोकनेते गोपीनाथराव मुंडे मानणारा आहे, त्यांचेवर प्रेम करणारा मोठा वर्ग याठिकाणी आहे. गडावर गेल्या आठ दिवसांपासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते, त्याची सांगता आज पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत आणि भाविक भक्तांच्या अलोट गर्दीत मोठया उत्साहात झाली.
या सोहळ्यास उपस्थित राहून त्यांनी किर्तन श्रवणाचा लाभ घेतला. मंदिरात श्री महालक्ष्मी देवीच्या भव्य मुर्तीची प्रतिष्ठापना यावेळी त्यांच्या हस्ते करण्यात आली. करवीर पीठाचे शंकराचार्य यावेळी उपस्थित होते.

महंतांकडून फुलांचा वर्षाव ; रथातून मिरवणूक

सांगता कार्यक्रमास जाण्यापूर्वी मंदिरापासून तीन किमी अंतरावर असलेल्या कमानीसमोर पंकजाताई मुंडे यांचे भाविक भक्तांनी जोरदार स्वागत केले, वाजत-गाजत रथातून मिरवणूकही काढली. संस्थानचे मठाधिपती ह.भ.प. बुवासाहेब महाराज खाडे यांनी स्वतः फुलांच्या वर्षावात त्यांचे स्वागत केले.

प्रत्येक क्षण कष्टकऱ्यांसाठी

यावेळी मनोगत व्यक्त करतांना पंकजाताई म्हणाल्या, हा भाग मुंडे साहेबांवर जीवापाड प्रेम करणारा आहे. ते अनेक लोकांचे पितृछत्र होते, त्यांच्या जाण्याने अजूनही लोकांना आठवण येते व डोळ्यात अश्रू येतात. वंचित घटकांसाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. आजही त्यांच्या नांवाशिवाय कोणतीही गोष्ट पूर्ण होत नाही.
राजकारणात माझा काही स्वार्थ नाही. चांगलं कर्म करा, फळाची अपेक्षा करू नका असा संदेश भगवदगीतेने दिला आहे. माझ्या जीवनातील प्रत्येक क्षण कष्टकऱ्यांसाठी सेवेसाठी खर्च करत आहे असे सांगत शेतकरी, शेतमजूर, गोरगरीबांवर महालक्ष्मीची कृपा व्हावी अशी प्रार्थना त्यांनी केली. कार्यक्रमास पंचक्रोशीतील भाविक तसेच महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
••••

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!