बीड ।दिनांक १४।
सध्याच्या परिस्थितीत आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज आहे, असे असताना वीज कंपनीने त्यांचेवर सक्तीची वसुली मोहिम सुरू केली आहे, हे अतिशय अन्यायकारक आहे. थकबाकीपोटी शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट करू नका, अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केली आहे. वीजेची थकबाकी भरण्यासाठी शेतकऱ्यांना सवलत आणि वेळ द्यावाच लागेल असेही त्यांनी म्हटले आहे.
मार्च अखेरचे कारण पुढे करून वीज वितरण कंपनीने जिल्हयात वीज कनेक्शन कट करण्याची मोहीम सुरू केली आहे. जिल्हयातील शेतकऱ्यांना सत्ताधाऱ्यांनी अगोदरच वाऱ्यावर सोडले आहे, त्यांना विमा नाही की कुठलेही अनुदान नाही, त्यांचेकडे लक्ष द्यायला सत्ताधाऱ्यांना वेळ नाही शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम झाले आहे. अशा स्थितीत शेतकरी भयानक आर्थिक संकटात सापडला आहे, त्यातच वीज कंपनी त्यांच्या कृषी पंपाची वीज कट करून त्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहे. सध्या जिल्हयात मोठया प्रमाणात ऊस शेतात उभा आहे, त्याला पाणी देणे आवश्यक आहे पण कृषी पंपाची वीज तोडल्यास शेतकरी ऊस अथवा अन्य पिकांना कुठून पाणी देणार? वीज बिल सक्तीचा बडगा उगारून त्यांना दुहेरी कात्रीत पकडू नका असे पंकजाताई म्हणाल्या. शेतकऱ्यांची वीज कट करू नका तसेच त्यांना यासाठी वेळ व सवलत तुम्हाला द्यावीच लागेल अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.
••••