बीड, दि. 8 (लोकाशा न्यूज) : महिला दिनाचे औचित्य साधून तीन महिला वैद्यकीय अधिकार्यांना जिल्हा आरोग्य अधिकारी पदाचा कारभार देण्यात आला. तसेच प्रातिनिधिक स्वरूपात डॉक्टर, कर्मचार्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अमोल गित्ते यांनी वेगळा विचार करत मनाचा मोठेपणा दाखवित महिला सहकार्यांचा अनोखा सन्मान केल्याने स्वागत होत आहे.
महिला दिनाच्या निमित्ताने सर्वच पाटोदा तालुक्यातील वाहली आरोग्य केंद्राच्या प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ.चैताली भोंडवे, बीड तालुक्यातील नाळवंडीच्या प्रभारी डॉ.प्रज्ञा तरकसे व केज तालुक्यातील वीडा येथील डॉ.शितल कांबळे या तीन महिला वैद्यकीय अधिकार्यांना जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयात बोलावण्यात आले. तेथे त्यांना सन्मान करून काही वेळासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून काम करण्याची संधी दिली. तसेच कार्यालयातील इतर महिला कर्मचार्यांचाही सत्कार करण्यात आला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अमोल गित्ते यांनी केलेल्या सन्मानामुळे अधिकारी, कर्मचारीही भारावून गेले होते.
आमच्या सर्वच अधिकारी, कर्मचार्यांचा
आम्हाला सार्थ अभिमान : डॉ. गित्ते
पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून महिला अधिकारी, कर्मचारी काम करत आहेत. त्यांचा आदर वर्षभर केला जातो. परंतू महिला दिनाच्या निमित्ताने त्यांचा सन्मान करण्याची संधी मिळतेय, हे भाग्यच आहे. आमच्या सर्वच अधिकारी, कर्मचार्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
- डॉ.अमोल गित्ते, जिल्हा आरोग्य अधिकारी बीड
पोलिस खात्यातही अनेक महिला
झाल्या ठाणेदार
काल बीड जिल्ह्यात जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, जिल्हा परिषदेबरोबरच पोलिस खात्यातही काही महिला अधिकारी आणि कर्मचार्यांनी एक दिवस ठाणेदार म्हणून काम पाहिले. तसेच अप्पर पोलिस अधीक्षक सुनिल लांजेवार आणि कविता नेरकर यांनी महिला अधिकारी आणि कर्मचार्यांचा सत्कार केला.